माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी परतले होते. परंतु, पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. बुधवारी दुपारी निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.
