ग्रामपंचायत उप सरपंचपदी रावसाहेब पवार यांची निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या डिग्रस ग्रामपंचायत उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब मुरलीधर पवार यांची निवड झाली. दिनांक ०६/११/२०२३ रोजी निकाल लागलेल्या डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये रावसाहेब पवार यांच्या जनसेवा मंडळाने सर्वाधिक दहा जागा जिंकल्या होत्या.
तर विरोधी तीन पॅनल यांच्या एकत्रित सात जागा निवडून आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये काल दिनांक २३/११/२०२३ रोजी उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी रावसाहेब पवार यांचे गटाकडून एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर विरोधी मंडळाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
विहित वेळेनंतर रावसाहेब मुरलीधर पवार व विरोधी मंडळाच्या वतीने अनिल अंबादास शिंदे या दोघांचेच अर्ज राहिल्याने या दोघांमध्ये उपसरपंच निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडून रावसाहेब पवार हे एकूण दहा मते घेऊन मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यानिमित्त डिग्रस गावात मोठा जल्लोष करण्यात आला.
रावसाहेब पवार यांनी यापूर्वी डिग्रस ग्रामपंचायतचे पंधरा वर्ष सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, बाबळेश्वर दूध संघाचे संचालक असे विविध पदे भूषवलेली आहे. जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेते अशी त्यांची परिसरामध्ये ओळख आहे. रावसाहेब पवार हे राष्ट्रवादीचे तनपुरे घराण्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या निवडीबद्दल राहुरी तालुक्याचे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या निवडीसाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य संदीप गावडे, प्रतिभा कोकाटे, रामनाथ गावडे, उषा पवार, दिपाली पवार, सुनिता पवार, कुसुम गिरगुणे,अमोल बेलेकर, ज्योती घोरपडे यांनी अनमोल सहकार्य केले. तर जनसेवा मंडळाचे मोहनराव काळे, राजकुमार भिंगारदे, संदीप कोकाटे, बापूसाहेब मोरे, सुभाष बेलेकर, दादा थेटे, शिवाजी साळवे इ. सहकार्य केले.
