अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर
नगर : राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, असा विश्वास व्यक्त करीत अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. हनुमंत सुतार यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अंबादास धनगर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष तेजस टेंगले यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे ेआदेश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना ओबीसी सेवा संघाने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राणी पंडित यांनी दिली आहे. ओबीसी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून कर्डिले यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.