नांदेड - बुथनिहाय मतदान यादीने गावपुढाऱ्यांची होतेयं गोची!
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
गावाचे मतदान तुम्हालाच म्हणणारे पडले तोंडघशी
गावागावांत कटुता पसरण्याची शक्यता.
किनवट/नांदेड,दि:३०:- जिल्ह्यातील किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. दरम्यान या निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांनी शहरासह अतिदुर्गम भागात जाऊन प्रचार केला. या गावातील पुढाऱ्यांसह विविध समाजाच्या ठेकेदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्यामुळे 'भाऊ, काही काळजी करू नका, संपूर्ण गाव तुमच्याच बाजूने', असा उमेदवाराला विश्वास त्यांनी दिला होता. आता प्रशासनाकडून बुथनिहाय याद्या जाहीर झाल्याने विजयी उमेदवारांपेक्षा पराभूत उमेदवारांनी या बुथनिहाय याद्यांचे अवलोकन सुरू केल्याने वास्तविक किती मतदान झाले हे उघड होत आहे. यामुळे अनेक गावपुढारी व समाजाच्या ठेकेदारांची गोची झाली असून ते आता चांगले तोंडघशी पडले आहेत. तसेच अनेक गावांमध्ये कटुताही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सामाजिक माध्यमातून 'संपली निवडणूक, करा नात्यांची जपवणूक' असे संदेश व्हायरल होत. याबाबत गावागावांत गमती जमती ऐकायला येत आहेत. काहींच्या मते पराभूत उमेदवाराला तोंड कसे दाखवावे, या विचाराने ते बाहेरगावी गेले आहेत तर काही आपले पितळ उघडे झाल्याने उमेदवाराचा राग शांत होईपर्यंत दूर गेलेले बरे अशा वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तसेच काहींच्या मते, निवडणूक आयोगाने बुधनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर करू नये. तर काही पराभूत झालेल्या सज्जन उमेदवारांनी जे झाले ते विसरून कुणालाही दोष न देता आत्मचिंतन करीत आहेत.असले तरी बुथनिहाय मतदान बाहेर येण्याच्या सुविधेमुळे पराभूत उमेदवार काही गावे आणि वस्त्यांवर वचपा काढण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाने दिलेली ही सुविधा ग्रामीण भागात वादाचे कारण ठरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात अनेक गावे आणि वस्त्यांमध्ये अमुक कामे करून द्या किंवा एखाद्या कामासाठी अमुक निधी आताच द्या, सगळे मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील, असे आश्वासन दिले. तसेच आमचा समाज खूप मोठा असून, गठ्ठा मते असल्याने समाजासाठी काही तरी द्या, असे म्हणत समाजाच्या ठेकेदारांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. या गावपुढारी व समाजाच्या ठेकेदारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारांकडून लाभ पदरात पाडून घेतल्याची उदाहरणे आहेत. मात्र त्याचा सकारात्मक परिणाम मतपेटीतून दिसून न आल्याने आता पराभूत उमेदवारांकडून त्याचा जाब विचारणार की काय असे वाटत आहे. काहींनी प्रचाराच्या काळात पुढाकार घेणाऱ्या गाव पुढाऱ्यांची भेट घेत किंवा त्याला बोलावून याचे कारणही विचारल्या जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक गाव पुढाऱ्यांनी प्रचाराच्या काळात फुशारक्या मारून स्वतःचा फायदा करून घेतला आता मतमोजणीनंतर त्या गावातील मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी पुढे आल्याने ज्यांनी मतांचे कंत्राट घेतले होते, अशा अनेक पुढाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आता काहींनी आपले मोबाइल फोन बंद ठेवले तर काही उमेदवारांपासून आपले तोंड लपून फिरत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दृष्टीस पडत आहे.
