एसटी बस व दुचाकीचा समोरा समोर भिषण अपघात, एक तरुण ठार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्या जवळ दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात युवराज भूजाडी हा तरूण ठार झाल्याची घटना घडली.
राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील युवराज कैलास भुजाडी हा २१ वर्षीय तरुण सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. तो दररोज त्याच्या दुचाकीवर ये जा करत असे.
दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळ ७ वाजे दरम्यान युवराज भूजाडी हा नेहमी प्रमाणे त्याच्या दुचाकीवर नगर एमआडीसी येथे कामाला जात होता. नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्या जवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी त्याच्या दुचाकीला समोरून येणार्या एसटी बसची जोराची धडक बसली.
या धडकेत युवराज भुजाडी हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र युवराज भुजाडी हा उपचारा पुर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय आधिकार्यांनी घोषित केले. त्यानंतर युवराज याचे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी ३ वाजता जोगेश्वरी आखाडा येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
