सरपंच यांना मोठेपणा देत नसल्याच्या कारणावरून लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील सरपंच अर्जुन म्हसे यांना मोठेपणा देत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी ज्ञानेश्वर म्हसे यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व बोटातील अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली. ही घटना राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल येथे दि. ३ डिसेंबर रोजी घडली.
ज्ञानेश्वर दत्तात्रय म्हसे, वय ४२ वर्षे, रा. कोंढवड, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजे दरम्यान ज्ञानेश्वर म्हसे हे राहुरी शहरातील ग्रीन हॉटेलच्या बाहेर बसले होते. तेव्हा तेथे आरोपी आले व म्हणाले कि, तुम्ही आमचे सरपंच अर्जुन पाटीलबा म्हसे यांना मोठेपणा का देत नाही व कार्यक्रमामध्ये त्यांचे नाव का घेत नाही.
तेव्हा ज्ञानेश्वर म्हसे त्यांना म्हणाले कि, जो कार्यक्रमामध्ये मोठी देणगी देईल, त्यांचे नाव मी घेईल. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी ज्ञानेश्वर म्हसे यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्कयाने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व बोटातील दिड तोळे वजनाची सोन्याची अंगठी काढुन घेतली. आणि तु गावात आला तर आम्ही तुझा कार्यक्रम करणार, तुला जिवंत मारुन टाकु, अशी धमकी दिली.
ज्ञानेश्वर दत्तात्रय म्हसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी दिपक पाटीलबा म्हसे व गोकुळ पाटीलबा म्हसे, दोन्ही रा. कोंढवड, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. १२५६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११९ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
