संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना थेट हस्तांतरण योजनेमार्फत लाभ- नामदेव पाटील.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
विशेष सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत राबविणेत येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधील वयोवृध्द, दुर्धर आजारी, दिव्यांग, परितक्ता व विधवा महिला अशा पात्र लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य तहसील कार्यालयामार्फत लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येत होते. परंतु आता अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. द्वारे डिसेंबर २०२४ पासून थेट हस्तांतरण योजनेद्वारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे, अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देताना तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण जलदगतीने करणे व नागरीकांना मिळणाऱ्या सेवा जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाज पद्धतीचे पुनर्विलोकन करुन प्रशासकिय कार्यपध्दतीमध्ये सेवा अतिशय सुलभ पद्धतीने देऊन नागरीकांचे जीवन सुकर व्हावे. याकरीता शासना मार्फत योजनांचा लाभ डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्या बाबत शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थ सहाय्याचे वितरण डी.बी. टी. द्वारे डिसेंबर २०२४ पासून करण्यात आले आहे. हे अनुदान चालु महिन्यात थेट हस्तांतरण योजनेव्दारे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.
डिसेंबर २०२४चा लाभ हा डिबीटी (थेट हस्तांतरण योजनेद्वारे) लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर डिसेबर २०२४ चा लाभ प्राप्त झालेला नाही, अशा लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांक घेऊन बँकेत जाऊन एनपीसीआय मॅपींग करुन घ्यावेत.
एनपीसीआय मॅपींग केल्यानंतर अशा लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय राहुरी येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
