Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर : प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल !

 प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल  ! 




खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला 


प्रतिनिधी : प्रतिनिधी 


     प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देत खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीमध्येही आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. दरवर्षी प्रत्येक खासदाराला असलेला ३५ केसचा कोटा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या कोटयातून २७ केसेससाठी निधी मिळवत नीलेश लंके हे सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देणारे खासदार ठरले आहेत. 

    पाच वर्षांपूर्वी विधानसभेत पारनेर-नगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिला होता. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे नीलेश लंके यांनी या योजनेचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिल्याचे जाहीर केले होते. 

     खा. नीलेश लंके यांच्याकडे दररोज अनेक रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक उपचारासाठी मदत मिळावी यासाठी येतात. खा. लंके हे रूग्णाच्या आजाराची माहीती घेऊन मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यास मदत मिळेल का याची खात्री करतात. संबंधित आजार दोन्ही योजनांच्या निकषामध्ये बसती नसतील तर लंके हे स्वतः धर्मदाय रूग्णालयांशी संपर्क करून त्या रूग्णावर उपचार करण्याची व्यवस्था करतात. वेळप्रसंगी सामाजिक संस्थांशी संपर्क करून संबंधित रूग्णास मदत मिळवून देण्यासाठीही लंके यांची धडपड असते.