कचरा टाकण्याच्या कारणावरुन लहान मुलीशी वाद, नंतर पती पत्नीला मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
कचरा टाकण्याच्या कारणावरुन लहान मुलीशी वाद झाला. त्यानंतर दोघा पती पत्नीला गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना दि. ८ जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली.
राजु विठ्ठल रासकर, वय ४१ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहत असून त्यांच्या शेजारी कादरभाई गणी शेख हा कुटुंबासहीत राहण्यास आहे. दि. ८ जून २०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजे सुमारास राजू रासकर यांच्या मुलीचे कचरा टाकण्याच्या कारणावरुन आरोपीशी वाद झाले आणि आरोपींनी तीला शिवीगाळ केली.
त्यावेळी राजू रासकर आरोपींना म्हणाले कि, लहान मुलांचे वाद आहेत, तुम्ही विनाकारण शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी राजू रासकर व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राजू रासकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील मनी मंगळसुत्र तुटुन गहाळ झाले.
नंतर राजु विठ्ठल रासकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी कादरभाई गणी शेख, मुस्कान शेख, महेक जाकीर शेख, रुबिना कादरभाई शेख, सर्व रा. बांबोरी, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६५०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
