Type Here to Get Search Results !

राहुरी - रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा चालू करण्याची मागणी.- खा. लंके व खा. वाकचौरे या दोघांना कर्तव्याचा विसर पडला- मा. खा. प्रसाद तनपुरे.


 


रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा चालू करण्याची मागणी.

खा. लंके व खा. वाकचौरे या दोघांना कर्तव्याचा विसर पडला- मा. खा. प्रसाद तनपुरे.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.

राहुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची वाताहात झाली आहे. कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा चालू झाले नाहीत. आरक्षित तिकीट विक्री सुद्धा बंद झाली. एकेकाळी प्रवाशांच्या वर्दळीने गजबजणार्‍या रेल्वे स्थानकावर आज शुकशुकाट असतो. या अधोगतीला राजकीय उदासीनता कारणीभूत आहे. अशा शब्दांत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


माजी खासदार तनपुरे म्हणाले, राहुरी रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण व सुशोभीकरण व्हावे. यासाठी मॉडेल रेल्वे स्थानक योजनेत समावेश होण्यासाठी १९९७-९८ साली मी प्रयत्न केले, त्याला यश मिळाले. २३ सप्टेंबर २०२४ रोजी राहुरी स्थानकाची नवीन वास्तू प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. परंतु कोरोनात पॅसेंजर गाड्यांचे थांबे बंद झाले. त्यामुळे आरक्षित तिकीट विक्री बंद झाली.


सन २०१६ साली विद्युतीकरण व डबल लाईनच्या कामामुळे आठ पैकी चार पॅसेंजर बंद झाल्या. सन २०२० मध्ये कोरोनात उर्वरित चार पॅसेंजर बंद झाल्या. कोरोना संपल्यावर २०२२ मध्ये मुंबई-शिर्डी व शिर्डी-पंढरपूर एक्स्प्रेस चालू झाल्या. परंतु त्यांचा राहुरीचा थांबा बंद झाला. रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी केली. परंतु रेल्वे मंत्रालयाकडे कोणत्याही खासदाराने पाठपुरावा केला नाही.


राहुरी रेल्वे स्थानकात निजामाबाद-पुणे (दु. १), दौंड-निजामाबाद (सायं. ७.१५) या दोन फेऱ्यांना थांबा राहिला आहे. त्यांच्यासाठी जनरल तिकीट विक्री पुरती स्थानकाची नवीन वास्तूतील सेवा मर्यादित झाली आहे. रेल्वे गाड्यांना थांबा नाही, म्हणून प्रवासी नाहीत आणि प्रवासी नाहीत म्हणून रेल्वे गाड्यांना थांबा नाही, अशा दुष्टचक्रात स्थानक अडकले आहे.


जागतिक कीर्तीचे शनि शिंगणापूर देवस्थानसाठी सर्वात जवळचे राहुरी रेल्वे स्थानक आहे. शिर्डी वरून शनि शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राहुरी रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण आहे. राहुरी शहरातील व्यापारी, यात्रेकरू प्रवासी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आदी रेल्वे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने रस्ता मार्गाचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.


राहुरी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील हॉटेल्स, इतर छोटे व्यवसाय, रिक्षा व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. राहुरी तालुक्यातील जनतेने खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांनाही मतदान केले. परंतु त्यांना कर्तव्याचा विसर पडला आहे. असे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगीतले. 

बंद झालेल्या रेल्वेगाड्या अशा : पुणे-इगतपुरी (स. ६), इगतपुरी-पुणे (रात्री १२), नांदेड-दौंड (सकाळी ९), दौंड-नांदेड (सायं. ४), नांदेड-पुणे- बारामती (दु. २), बारामती-पुणे-नांदेड (सायं. ७), मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस (स. ९), शिर्डी-मुंबई साईनगर एक्सप्रेस (सायं. ६), पंढरपूर-साईनगर (स. ६), साईनगर-पंढरपूर (सायं. ७).
      
यांना मिळावा थांबा...!
पुणे-नागपूर एक्सप्रेस (रात्री ८.३०), नागपूर पुणे (स. ४.३०), पुणे-जम्मूतवी झेलम एक्सप्रेस (रात्री ८.३०), जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस (दु. १२), गोवा-जम्मूतवी एक्सप्रेस (स. ८.३०), जम्मूतवी-गोवा (दु. १), बेंगलोर-दिल्ली केके एक्सप्रेस (सायं. ६), दिल्ली-बेंगलोर केके एक्सप्रेस (दु. १२), पुणे-अमरावती (दु. २.३०), अमरावती-पुणे (स. ८) तसेच कोरोना नंतर बंद झालेल्या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. अशी प्रवाशांची मागणी आहे.