कणगर येथे गटविकास अधिकारी तायडेंच्या हस्ते वृक्षारोपण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने राहुरी तालुक्यातील 25 गावांची मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी निवड केली असून कणगर येथे गटविकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या हस्ते 10 गुंठे जागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तीन हजार घनदाट झाडी मियावाकी वृक्ष लागवड करण्याचा श्रीगणेशा वृक्षारोपण करून करण्यात आला.
यावेळी सुरेश तायडे यांनी ग्रामस्थांना मियावाकी वृक्ष लागवडी बाबत माहिती दिली. सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायतने स्वखर्चातून किंवा लोकवर्गणीतून एका गुंठ्यात तीनशे जंगली झाडे, फळझाडे, फुलझाडे या पद्धतीने लावायचे आहेत. सदर झाडे एकमेकांशी स्पर्धा करून घनदाट असे जंगल तयार होईल.
सध्या हा पथदर्शी प्रकल्प असून यापुढे मोठ्या प्रमाणात जंगल निर्माण करण्यासाठी मीयावाकी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्जन्यमान वाढवून दुष्काळी भागांना त्याचा फायदा होणार आहे.
यावेळी कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, विस्ताराधिकारी तानाजी कोकाटे, कृषी विस्तार अधिकारी गणेश अनारसे, तसेच उपसरपंच बाळासाहेब गाढे, सुभाष नालकर, संदीप घाडगे, धनंजय बर्डे, भाऊसाहेब आडभाई, भाऊसाहेब घाडगे, शंकर जाधव, ग्रामपंचायत अधिकारी चव्हाण, संभाजी निमसे, जगन्नाथ नालकर, महमदभाई इनामदार, भारत खाटेकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
