संगमनेरला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत 50 लाख रुपये मंजूर
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्रा च्या विकासकामांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘क वर्ग’ तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत पारेगाव बुद्रुक येथील रेणुका माता संगमनेर खुर्द येथील अमृतेश्वर मंदिर आणि वेल्हाळे येथील हरीबाबा मंदिर परिसर सुशोभीकरणा साठी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी अहिल्यानगर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास साधण्यासाठी राज्य शासन दरवर्षी निधी उपलब्ध करून देते. संगमनेर तालुक्यासाठी मंजूर निधीतून मंदिर परिसराचा विकास होऊन तीर्थ क्षेत्रांना नवे रूप प्राप्त होणार आहे. या
निधीतून तीन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये पारेगाव बु. येथे श्री रेणुकामाता मंदिरात भाविकां साठी सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात येणार असून यासाठी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. संगमनेर खु. येथे ऐतिहासिक श्री अमृतेश्वर देवस्थान मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे, यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच वेल्हाळे येथे श्री हरिबाबा देवस्थान परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी तब्बल २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान मंजूर झालेली कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार खताळ यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या देवस्थानांना नवे रूप मिळणार असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील भाविक व नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील देवस्थानांवर सर्वांचीच श्रद्धा आणि आस्था आहे. अशा धार्मिक व ऐतिहासिक देवस्थानांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. मंजूर निधीतुन या मंदिर परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. तसेच विकास कामांमुळे भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता येतील. धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. या निर्णयासाठी मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानतो
श्री अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा.
