Type Here to Get Search Results !

पुणे - व्हल्कन टेक्नॉलॉजीज् तर्फे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी प्रायमरी स्कूल येथे कथाकथन व पुस्तक दान उपक्रम





व्हल्कन टेक्नॉलॉजीज् तर्फे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी प्रायमरी स्कूल येथे कथाकथन व पुस्तक दान उपक्रम

पुणे: एआयएसएसएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी प्रायमरी स्कूल या ठिकाणी (ता. १२) व्हल्कन टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड तर्फे कथाकथन सत्र व पुस्तक दान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात तिसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.

कथाकथन सत्रासाठी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, पटकथा लेखक तसेच नाट्य अभिनेते अरविंद मित्तल हे उपस्थित होते. मित्तल यांनी ‘स्मॉल थिंग्ज मॅटर’ या त्यांच्या नव्या पुस्तकातील निवडक कथा विद्यार्थ्यांना वाचून दाखवल्या. दहा नैतिक कथांचा हा संग्रह मुलांना सहानुभूती, करुणा व सचोटी यांसारख्या जीवनमूल्यांची जाणीव करून देणारा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी सराव प्रश्न दिले असून त्यातून लहान मुलांना स्वतःच्या शब्दांत विचार मांडायची, व्यक्त होण्याची संधी मिळते. 

सत्रादरम्यान छोट्या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “छोट्या छोट्या गोष्टींमुळे किंवा कृतींमुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजात सकारात्मकता निर्माण होते. दैनंदिन जीवनातील छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टींकडे किंवा कृतींकडे मुलांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.” 

एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. “पुस्तके खरे मित्र आहेत आणि जे  जीवनाचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. विद्यार्थीदशेतच मुलांना चांगल्या वाचनाची सवय लागली तर त्यांच्यातील कुतूहल, संवेदनशीलता आणि सामाजिक जाण अधिक वृद्धिंगत होते. व्हल्कन टेक्नॉलॉजीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले. 

“विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवून त्यातून विविध जीवनमूल्यांचे संवर्धन करणे हे शिक्षण प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये सुसंस्कारांची जडणघडण होते,” अशा भावना मुख्याध्यापिका शांती चरेजा यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

“उपपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात वाचन संस्कृतीसोबत जीवनमूल्यांची बीजेही पेरली गेली. “कथा ऐकताना आम्हाला खूप मजा आली. त्यातून शिकण्यासारखेही बरेच काही मिळाले. भेट देण्यात आलेली पुस्तके आम्ही रोज आवर्जून वाचू”, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.