तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात उद्बोधन कार्यशाळा
राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या युवकांची आज खरी गरज - प्राचार्य डॉ. संजय चाकणे
प्रतिनिधी सुनिल पिंगळे तळेगाव ढमढेरे , ,
बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्राप्रती समर्पणाची भावना असलेल्या युवकांची आज खरी गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व शैक्षणिक संशोधन विभागाने आयोजित केलेल्या उद्बोधन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चाकणे बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक खाबडे, सह कार्यक्रम अधिकारी डॉ. शाकूराव कोरडे आधी याप्रसंगी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. चाकणे पुढे म्हणाले की, सेवा, त्याग आणि समर्पणाची भावना आजच्या युवकांचा प्राधान्यक्रम असायला हवा. कमी होत चाललेली वाचन संस्कृती ही समाजासाठी हानीकारक असून युवकांची एकाग्रता क्षीण होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये मोबाईलचा अतिवापर देखील घातक ठरणारा आहे. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वाचन, लेखन,संभाषण आणि सामाजिक बांधिलकी जोपासून व्यक्तिमत्व विकास करणे काळाची गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेली ग्रामव्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ असून तरुणांनी अधिक सकारात्मकतेने यासाठी योगदान देणे गरजेचे असल्याचेही डॉ. चाकणे यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी आपले संस्कार आणि समृद्ध परंपरा जोपासण्याचे आवाहन युवकांना केले. विविध परंपरा आणि वैविध्यतेने नटलेला आपला भारत देश विकसित होण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालय युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी तळेगाव ढमढेरे महाविद्यालय सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्राचार्य प्रा. डॉ.पराग चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक खाबडे यांनी प्रास्ताविक तर सह कार्यक्रम अधिकारी डॉ. शाकूराव कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रिती पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
...........................



