वारंवार वांबोरी खुला तर बारागाव नांदूर गटावरच आरक्षण का?- धिरज पानसबळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा वांबोरी व बारागाव नांदूर जिल्हा परिषद गट चर्चेत आले आहे. गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांत सातत्याने बारागाव नांदूर गटावर वेगवेगळे आरक्षण लादले गेले असून, अद्यापही तो सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुला झालेला नाही. याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत युवा नेते धीरज पानसंबळ यांनी एका गटावरच वारंवार आरक्षण आणि दुसरा गट कायम खुला कसा ? असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
धीरज पानसंबळ म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून वांबोरी जिल्हा परिषद गट सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुला आहे. दुसरीकडे, बारागाव नांदूर गट हा एकही वेळा खुला न झाल्यामुळे सामान्य जनतेमध्ये रोष आहे. वांबोरी गटात अनुसूचित जाती-जमातीचे लोक राहत नाहीत का? किंवा बारागाव नांदूरमध्ये इतर प्रवर्गातील नागरिक नाहीत का? जर सातत्याने एकाच गटावर आरक्षण लादले जात असेल, तर तो सामाजिक न्यायाचा आधार न राहता, राजकीय समीकरणांचे आणि दबाव तंत्राचे साधन बनते. त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षित असेल तर त्या भागातील पंचायत समिती गण तरी खुला ठेवला जावा, अशी संतुलित आरक्षण प्रणाली राबवण्याची आवश्यकता आहे. मात्र वास्तवात दोन्हीही गण आरक्षित ठेवले जातात, ज्यामुळे नवख्या आणि सामान्य पार्श्वभूमीतून येणाऱ्या युवकांचे राजकीय नुकसान होत आहे. यामुळे त्यांच्यात असलेली नेतृत्व क्षमता, लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही दाबली जाते, असेही ते म्हणाले.
प्रशासन आणि निवडणूक आयोगाने मागील निवडणुकांचा आराखडा तपासून एखाद्या गटावर वारंवार लादले जाणारे आरक्षण थांबवावे, अशी मागणी धीरज पानसंबळ यांनी केली आहे.
