राहुरी पोलिस पथकाची यशस्वी कारवाई.
जांभळीतील अपहरण प्रकरणातील 17 वर्षीय मुलगी सुरक्षित.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तालुक्यातील जांभळी गावातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून संबंधित मुलगी सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. ती परत न आल्याने तिच्या पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 282/2026 भा.न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस हवालदार विकास वैराळ यांना गोपनीय माहितीदारामार्फत संबंधित मुलगी बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली.
या पथकात पोलीस हवालदार विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते आणि सागर नवले यांचा समावेश होता. पथकाने तत्परतेने कारवाई करत 8 एप्रिल 2026 रोजी मुलीचा शोध लावून तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 108 मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात मोठे यश मिळत असून समाजात पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ होत आहे
