मुळा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई.
पारनेर/प्रतिनिधी घारगाव पोलीस स्टेशनचे सपोनि हेमंत थोरात यांना १ जून २०२६ रोजी मुळा नदीपात्रातील देसवडे येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव आणि पारनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने महसूल विभागाच्या सहकार्याने संयुक्त धडक कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा टाकला.
या कारवाईत सहा आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आले. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: १) रोशन भाऊसाहेब बर्डे (२३, वनकुटे), २) वैभव सिताराम गुंड (देसवडे), ३) नवनाथ रघुनाथ ढोकरे (४०, खडकवाडी), ४) अभिषेक संतोष भोर (२४, देसवडे), ५) श्रीहरी बाळू पवार (२१, तास) तर ६) मनोज टेकुडे (फरार) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एक जेसीबी, दोन टेंपो, एक हायवा आणि एक ट्रॅक्टर असा एकूण २२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४३०/२०२६ नोंद करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईचे श्रेय मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मक्का सुदर्शन सो., अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात आणि पोनि संतोष खेडकर यांच्या पथकाला जाते. या मोहिमेत पोहेकॉ अमोल धामणे, कल्याण लगड, ढोकरे, मिठु वैराळ, गणेश डोंगरे, सारंग वाघ, चांगदेव नेहे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, तहसील कार्यालयातील जगन्नाथ भालेकर व दत्तात्रय शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ मिठु वैराळ हे करत आहेत.
नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नदीकाठच्या शेतीला संरक्षण देण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सातत्याने चालू राहतील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
