Type Here to Get Search Results !

राहुरी | महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आ. प्राजक्त तनपुरे यांची निवड

 महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आ. प्राजक्त तनपुरे यांची निवड



राहुरी | प्रतिनिधी


महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


निवडीनंतर आ. तनपुरे यांनी असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी, जिल्हा संघटना आणि संपूर्ण व्हॉलीबॉल परिवाराचे आभार मानले. ही निवड आनंदाची असली तरी त्यासोबत मोठी जबाबदारी असल्याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी चंद्रपूरचे श्री. जीवतोडे यांची असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच मावळते अध्यक्ष श्री. प्रतीक पाटील यांनी असोसिएशनचे सक्षम नेतृत्व करत संघटनेच्या प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.


राज्यातील व्हॉलीबॉल खेळाला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि नवी उंची मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. ग्रामीण भागापासून राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या खेळाडूंना अधिक संधी, दर्जेदार सुविधा आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचा व्हॉलीबॉल अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.