दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रामुख्याने नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे, दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिकांनी व लहान बालकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहनही राज्य सरकारने केले आहे.दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने दिवाळीसाठी जाहीर केलेली गाइडलाइन्स पुढील प्रमाणे.
• राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिवाळीही अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावी.
• फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.
• दिवाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.
• कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.