फार्मसी करिअर : एक उत्तम सुवर्णसंधी - कु.वैशाली घुमे
![]() |
| लेखन: कु.वैशाली कैलास घुमे |
ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे आणि त्यात करिअर करावे, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी औषधनिर्माणशास्त्र हा यशस्वी पर्याय आहे. औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) हा अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्र यांच्यासारखाच एक उत्कृष्ट व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. रुग्णांना जीवनदान मिळण्यात मोठा वाटा हा औषधांचा असतो. वैद्यकशास्त्र हे रोगाचे निदान करायला शिकवते तर औषधनिर्माणशास्त्र त्या रोगावर कोणते औषध वापरावे, ते कसे तयार करावे हे शिकवते. प्रत्येकाला जीवनात कुठल्या ना कुठल्या आजाराकरता किंवा रोगाकरिता औषध घ्यावे लागते, म्हणूनच औषधनिर्माणशास्त्र हे वैद्यकशास्त्र व रुग्ण यामधील महत्त्वाचा दुवा आहे.आणि या कामातून मिळणारा आनंद जीवनात समाधान देणारा आहे.
फार्मसी म्हणजे काय:
फार्मसी म्हणजे नेमकं काय तर हे एक विज्ञान आहे. आपण जी औषधे घेत असतो ती तयार झाली की थेट आपल्याला दिली जात नाहीत तर त्याचे परीक्षण केले जाते कारण ही औषधे रसायनांपासूनच तयार झालेली असतात. या रसायनांचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे.विविध प्रकारच्या आजारांच्या उपचारासाठी औषधांचे उत्पादन करण्याचे काम फार्मास्युटिकल कंपन्या करतात. थोडक्यात एखादा आजार रोखणे, तो ओळखणे, तपासणे आणि उपचारांसाठी संशोधन करणे यासाठी हे क्षेत्र निगडित आहे.आपल्या विचार शक्तीला चालना देणारे हे कार्य आयुष्यासाठी निश्चितच उपयुक्त असेच आहे.
प्रवेशप्रक्रिया कशी असते:
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा देणे आवश्यक असते. बारावीत खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के गुण, तसेच गणित किंवा जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण झालेले पाहिजे.
यानंतर विद्यार्थ्यांना डी.फार्म. (कालावधी- दोन वर्ष), बी.फार्म. (कालावधी- चार वर्ष) किंवा फार्म.डी. (कालावधी- सहा वर्ष) या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. डी.फार्म. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बी.फार्म.च्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतात. बी.फार्म. च्या शेवटच्या वर्षाला असताना पदव्युत्तर पदवी शिक्षण प्रवेशप्रक्रिया साठी जी-पॅट द्यावी लागते. एम.फार्म. (कालावधी- दोन वर्ष) किंवा फार्म.डी. (पोस्ट बॅचलरेट) च्या चौथ्या वर्षाला प्रवेश मिळतो. पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम.फार्म. झाल्यानंतर पीएच.डी. (कालावधी तीन ते चार वर्ष) करता येते.बी.फार्म. पुर्ण झाल्यानंतर एमबीए, एलएलबी यांसारख्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमानंतर परदेशात जाऊन एम.एस., पीएच.डी.देखील करता येते. ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात आवड आहे ते आयसीआरआय चा पदव्युत्तर पदवी पातळीवर अभ्यासक्रम करु शकतात. परदेशी संस्थांकडून हुशार विद्यार्थ्यांना यासाठी फेलोशिप मिळण्याचीही संधी उपलब्ध आहे. करिअर घडविण्यासाठी फार्मसी हे क्षेत्र फारच योग्य आहे.
नोकरीच्या संधी:
बी.फार्म आणि डी. फार्म केलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रात, केमिकल इंडस्ट्रीज, अन्न आणि औषध उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळतात. याशिवाय स्वत:चं मेडिकल/ फार्मसी स्टोअर सुरू करण्याचा पर्यायही आहे. फार्मसी स्टोअर सुरू करण्यासाठी स्टेट फार्मसी कौन्सिलकडून लायसन्स मिळवावं लागतं. बरेचसे फार्मसी पदवीधर झालेले विद्यार्थी बायोटेक लॅबोरेटरीजमध्ये काम करणं पसंत करतात, तर काही जण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सच्या सेल्स आणि मार्केटिंगचे काम करायला प्राधान्य देतात.
औषधे नियामक मंडळाच्या नियमांनुसार गुणवत्तापूर्ण औषधांची निर्मिती होत आहे, की नाही हे पाहण्याचं काम क्वालिटी कंट्रोलर करतात.
क्लिनिकलरिसर्च:
बायो इक्विव्हॅलन्स, बायोअॅव्हॅलिबिलिटी, सेंट्रल लॅबोरेटरीज यासारख्या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, टेक्निकल रायटर्स इत्यादी ठिकाणी फार्मसी ग्रॅज्युएट्सला नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.ज्यांना अध्यापनाची आवड आहे, ते साहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू होऊ शकतात आणि अनुभवानंतर सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक तसेच प्राचार्य किंवा संचालक या पदावर बढती मिळवू शकतात.उत्तम संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व असणारे पदविका किंवा पदवीधर मार्केटिंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात उत्तम करिअर घडवू शकतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रुजू झाल्यावर विभागीय तसेच राष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापक या पदापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी आहे. गुणवत्ता, चिकित्सक बुद्धी, आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द हे गुण ज्याच्या अंगी आहेत ते संशोधन क्षेत्रात काम करून आपला ठसा उमटवू शकतात.पदवी तसेच पदव्युत्तर पदवीधारकांना औषधी तसेच सौंदर्य प्रसाधन कंपनीमध्ये उत्पादन व निर्मिती विभाग, गुणवत्ता विश्लेषक विभाग, बौद्धिक संपदा विभाग, औषधी नियामकविषयक विभाग, औषधांची क्लिनिकल चाचणी, संशोधन, न्यूट्रास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रांत भरपूर मागणी आहे.खासगी व सरकारी क्षेत्रांत जसे रेल्वे, संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय संशोधन, प्रयोगशाळा, शासकीय दवाखाने, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादीमध्ये फार्मसी विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे. केंद्र सरकारच्या औषध नियंत्रण, संशोधन व राष्ट्रीय प्रयोगशाळा इत्यादी विभागांत उत्तम संधी उपलब्ध आहेत. तसेच एमपीएससी, यूपीएससी इत्यादी नागरी सेवा प्रवेश परीक्षेच्या माध्यमांतून उच्च पदावर औषध व आरोग्याशी निगडित असलेल्या विभागांत अनेक संधी उपलब्ध आहेत.
स्वयंरोजगाराच्या संधी :
फार्मसी हे व्यावसायिक शिक्षण असल्यामुळे शिक्षणार्थी स्वत:चा व्यवसाय चालू करू शकतात. कमीत कमी पदविका शिक्षण व स्टेट फार्मसीमध्ये नोंदणी झाली, तर औषध विक्रेता (रिटेल व होलसेल) म्हणून व्यवसाय चालू करता येतो. परवानाधारक फार्मासिस्ट औषधविषयक चाचणी, प्रयोगशाळा, रिपॅकिंग युनिट, औषधनिर्माण/ सौंदर्यप्रसाधन/ आयुर्वेदिक कंपनी, संशोधन केंद्र आदी सुरू करू शकतो. तसेच स्वत:चा औषध उत्पादन व निर्मितीचा उद्योग उभारून उद्योजक होण्याचीही संधी आहे.
परदेशातील करिअर संधी :
देशांतर्गत संधीशिवाय परदेशातही जसे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, कॅनडा, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व इतर अनेक देशांच्या फार्मसी क्षेत्रात यशाच्या शिखरांवर पोहोचण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रानंतर फार्मसी हे एकमेव क्षेत्र आहे की, ज्यात झपाटय़ाने वाढ झालेली दिसून येते. औषध क्षेत्रातील उलाढाल पाहता आपला देश विकसित देशांसमवेत गणला जातो. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यापूर्वीपासूनच लक्षणीय राहिलेली आहे. त्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या अभ्यासक्रमाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
केंद्र सरकारचा औषधनिर्मिती शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असून त्या प्रमाणात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील असाच आहे.म्हणून येणाऱ्या काळात फार्मसी करिअर एक उत्तम सुवर्णसंधी असल्याने विद्यार्थी मित्र,मैत्रिणीनी या क्षेत्रात करीयर केले तर यश निश्चित मिळेल.
लेखिका: कु.वैशाली कैलास घुमे
रा.चेडगाव ता.राहुरी

