Type Here to Get Search Results !

राहुरी - पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ६ गायी दगावल्या. लसीकरण करून घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन.

 पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ६ गायी दगावल्या.


लसीकरण करून घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तांदुळवाडी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने ६ शेतकऱ्यांच्या गायी दगावल्याच्या प्रकार घडला आहे.


मे महिन्यात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रात्रीच्या वेळी गावातील एका महिलेसह काही जनावरांना चावा घेतला होता. त्यानंतर पिसाळलेला कुत्रा मरण पावला. परंतु त्यानंतर गावातील दोन तीन गायी व कालवडी दगावल्या. त्यामुळे काही जनावरांना या कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात आले. त्यावर नागरिकांनी उपचार देखील केले. 


परंतु गायी दगावण्याच्या संख्येत वाढ होत एकापाठोपाठ एक अशा आज मितीस सुमारे ६ गायी दगावल्याने शेतकऱ्यांना धास्ती घेतली आहे. दरम्यान संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याने नेमका किती जनावरांना चावा घेतला. याची माहिती नसल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांना जखम झाली असेल त्यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. सदर आजार हा संसर्गजन्य नाही. असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


तांदुळवाडी येथे गायी दगावण्याच्या घटना झाल्याने संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात आले आहे. कुत्रा चावल्यानंतर १० दिवसांनी जनावरांमध्ये लक्षणे दिसतात. सदर आजार हा संसर्गजन्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. आजारी असलेल्या जनावरांना वेगळ्या ठिकाणी बांधणे, लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. बाधित जनावरांच्या दुधापासून कोणताही धोका नाही. असे राहुरी तालुका पशुधन विकास अधिकारी शैलेश बन यांनी सांगितले आहे.


तांदुळवाडी परिसरात गाईंना पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे संसर्ग झाला असल्यास अशा जनावरांच्या मालकांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधावा. जेणेकरून पुढील उपाययोजना करता येईल. गाईंना पिसाळलेल्याचा संसर्ग झाल्याची बाब लपवून ठेवू नये. असे आवाहन तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अमोल पेरणे यांनी केले आहे.