Type Here to Get Search Results !

राहुरी - विविध मागण्यांसाठी आठ दिवसानंतर तीव्र जन आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा.

 तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचा थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी येत्या आठ दिवसांचा अल्टिमेट.


विविध मागण्यांसाठी आठ दिवसानंतर तीव्र जन आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी येत्या आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. खासदार डॉ. सुजय विखे यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करून, त्यांचा निषेध करण्यात आला. विविध मागण्यांसाठी आठ दिवसानंतर तीव्र जन आंदोलन व उपोषण छेडले जाईल. असा इशारा युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे यांनी दिला.


राहुरी फॅक्टरी येथे काल डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या बैठकीत राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष निमसे बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार कृती समितीचे अध्यक्ष सुरेश थोरात होते. युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सचिव सचिन काळे, कामगार नेते इंद्रभान पेरणे, कारभारी खुळे, बाळासाहेब तारडे, चंद्रकांत कराळे यांनी मागील सात वर्षात खासदार डॉ. विखे यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.


विखेंनी सात वर्षे कामगारांचे तोंडदेखले कौतुक केले. बँकेने कारखाना जप्त केला, प्रशासक मंडळ आले, निवडणूक लागली, तरी माझ्या काळातील कामगारांच्या वेतनाचा एक रुपया बुडवणार नाही. असा शब्द खासदार विखेंनी वेळोवेळी दिला. त्यांच्या काळातील १७ महिन्यांचे वेतन, दोन वर्षांचे बोनस, दोन वेतन आयोगाच्या फरकांची रक्कम, रोजंदारीवरील कामगारांचे दोन पगार थकीत आहेत. 


मागील चार-पाच महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळाले नाही. कुटुंबाची उपासमार सुरू आहे. राहुरी बाजार समितीची निवडणूक झाल्यावर बोलू. असे खासदार विखेंनी सांगितले.  नंतर अनेकदा भेटीसाठी वेळ मागितला. परंतु टाळाटाळ झाली. दोन दिवसांपूर्वी लोणी येथे युनियनचे पदाधिकारी भेटीसाठी गेले. त्यांना चार तास बसवून अपमानास्पद वागणूक दिली. 


भेटल्यावर गणेश कारखान्याची निवडणूक झाल्यावर बोलू. एवढेच बोलून काहीही ऐकून न घेता खासदार विखे निघून गेले. असा आरोप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्याबद्दल कामगारांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. यापुढे कुणाचीही भेट घ्यायची नाही. घामाच्या दामासाठी आरपारची लढाई करायची. असे बैठकीत कामगार नेत्यांनी सांगितले.