Type Here to Get Search Results !

राहुरी - पोहण्यासाठी पाटात उतरलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

 पोहण्यासाठी पाटात उतरलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू.



पाटबंधारे विभागाने चार तास दखल घेतली नाही- धनराज गाडे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यातील मुळा धरणाच्या भिंती जवळील उजव्या कालव्यावरील वीज निर्मिती प्रकल्पाच्या नजीक कालव्यात दिनांक १६ जून २०२३ रोजी दुपारी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आकाश दगडू पवार, वय २२ वर्षे, रा. बारागाव नांदूर असे मृत तरूणाचे नाव आहे.


दिनांक १६ जून २०२३ रोजी दुपारी एक वाजता मुळा धरणाच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी आकाश पवार व त्याचे दोन पुतणे पाण्यात उतरले होते. कालव्यातून सिंचनासाठी १२५० क्युसेकने विसर्ग चालू होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आकाशची पाण्यात दमछाक झाली.  नाकातोंडात पाणी गेल्याने आकाश गटांगळ्या खायला लागला. त्याच्या सोबतच्या पुतण्यांनी आरडाओरड केला.  परंतु आकाश पाण्यात दिसेनासा झाला. त्याच्या पुतण्यांनी परिसरातील काही लोकांना घटटनेची माहिती दिली.


माजी जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज गाडे, नाना देवकर, रियाज इनामदार, शुभम देवकर आदींसह ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. परंतु उपविभागीय अधिकारी शरद कांबळे यांनी भ्रमणध्वनी बंद करून, कर्मचाऱ्यांना कालव्याचा विसर्ग कमी करण्याच्या सूचना दिल्या नाहीत.  


त्यामुळे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये संताप पसरला. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अखेर मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या आदेशाने कालव्याचा विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी करून सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात आला. कालव्यातील पाणी कमी झाल्यावर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली.  


एक तासाच्या शोध कार्यानंतर सायंकाळी सहा वाजता घटना स्थळापासून तीनशे मीटर अंतरावर कालव्यातील पाण्यात आकाशचा मृतदेह सापडला. मृताच्या मागे आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.


मुळा पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दुपारी एक वाजता घटनेची माहिती कळवून उजवा कालवा बंद करण्यास सांगितले.  परंतु त्यांनी चार तास दखल घेतली नाही. माणुसकीला काळीमा फासला. संतप्त ग्रामस्थांसह धरणावर गेल्यावर सायंकाळी पाच वाजता कालवा बंद करण्यात आला. असे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी सांगीतले.