Type Here to Get Search Results !

राहुरी - बस स्थानक पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात यावे- आ. प्राजक्त तनपूरे.

 बस स्थानक पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात यावे- आ. प्राजक्त तनपूरे.



बस स्थानकाच्या प्रलंबित प्रश्ना बाबत आ. प्राजक्त तनपूरे यांचा पाठपुरावा सुरूच.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


नगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व नवीन बस स्थानक इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राहुरी बस स्थानकाची पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात यावे. यासाठी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासन स्तरावर पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत.


 महाविकास आघाडी सरकारच्या काळात राहुरी बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली होती. सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीचा समावेशही करण्यात आलेला होता. मात्र महा विकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने विविध विकास कामांना स्थगिती दिलेली होती.


 त्यामुळे विविध विकास कामे रखडली आहेत. राहुरी बस स्थानक नवीन इमारतीसाठी अर्थ संकल्पात तरतूद केलेली असतानाही निधी उपलब्ध झालेला नसल्याने बस स्थानक इमारतीचा प्रश्न अधिकच रेंगाळत पडला. इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते. यात जीवीतहानी सारखा अपघातही घडू शकतो.


 बस स्थानक इमारत संपूर्ण तालुक्यातील लोकांसाठी अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या विकास कामासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. शुक्रवारी या प्रश्नासंदर्भात आमदार तनपुरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) विद्या भिलारकर यांची भेट घेऊन या कामासाठी त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी विनंती केली.  


तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थ संकल्पात राहुरी तालुक्यातील लोकांची गरज ओळखून बस स्थानकासाठी आवश्यक निधीची तरतूद केली होती. मात्र सत्तापालट झाल्यानंतर सर्व विकास कामांना ब्रेक लागला आणि बस स्थानकाचे काम रखडले. त्या कामास तात्काळ गती द्यावी. यासाठी उप महाव्यवस्थापिका यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला.