Type Here to Get Search Results !

पुणे - आरोग्य व्यवस्थेत परिचारिका महत्त्वाच्या: रुपाली चाकणकर

 आरोग्य व्यवस्थेत परिचारिका महत्त्वाच्या: रुपाली चाकणकर



मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नर्स केअर डे साजरा



पुणे प्रतिनिधी : आजारी रुग्णांच्या उपचारात डॉक्टरांसोबत काम  करणाऱ्या परिचारिकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. परिचारिकांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी समाजाने कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. 

सिंहगड रस्त्यावरील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नर्स केअर डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, संपूर्ण जगात नर्सिंग हा सर्वात महत्त्वाचा आरोग्य सेवा व्यवसाय आहे. आज आपण कोरोना महामारीच्या युगात त्याचे महत्त्व पाहत आलो आहे. परिचारिकांच्या माध्यमातून रुग्णांची चांगली काळजी घेतली जाते आणि त्यांचे प्रशिक्षण, अनुभव जीव वाचवण्यासाठी आणि लोकांना निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रुग्णांची काळजी घेण्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध असतात. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. अजितसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. ऋतुजा साळेकर यांच्या हस्ते रूपाली चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. किरण बांगडे, आशा क्षीरसागर, संध्या गायकवाड, रुपाली आंबेकर, वर्षा सोनावणे, विजया सुरवसे, शोभा चीनकर, वर्षा बोबले, नेहा घुमे, उषा हरणे आदी परिचारिका व महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.