राष्ट्र उभारणीच्या कार्यात वसंत व्याख्यानमालेचे महत्वपूर्ण योगदान
शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांचे गौरवोद्गार
नाशिक दि. 5 -
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेने राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्वपूर्ण आणि अविस्मरणीय योगदान दिले आहे असे गौरवोद्गार सोलापूर येथील शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी काढले.
माहे मे महिन्यातील वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षात जगभरातील व्याख्याते आमंत्रित करून व्याख्यानमालेचे स्वरूप लोकल ते ग्लोबल असे केल्याबद्दल गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने मालेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाचा सन्मान शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे आयोजक वसंत खैरनार होते.
भारतामध्ये व्याख्यानमाला अनेक आहेत परंतु संपूर्ण मे महिनाभर चालणारी नाशिकची वसंत व्याख्यानमाला ही एकमेव संस्था आहे. महात्मा गांधींपासून सावरकरांपर्यंत विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांनी या व्याख्यानमालेत आपले तेजस्वी विचार मांडले आहेत. या विचारांतून प्रेरणा घेऊन अनेक व्यक्तिमत्त्व घडली आहेत. नैराश्याने घेरलेल्या काही व्यक्तिमत्वांना येथील विचारांतून सावरण्याचे बळ मिळाले आहे. नवनवीन विचारांतून देशात नवीन संकल्पना उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्र उभारणीच्या कामात व्याख्यानमालेचे महत्वपूर्ण आणि अविस्मरणीय असे योगदान आहे असे डॉ. शेटे आपल्या भाषणात म्हणाले
आज समाजातील संवाद हरवत चालला आहे. त्यामुळेच नितीन देसाई सारखा दिग्गज कलादिग्दर्शकावर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यांनी समाजापुढे, आपल्या हितचिंतकांकडे असलेल्या अडचणींबाबत मन मोकळे केले असते तर निश्चितपणे मार्ग निघाला असता आणि या कलादिग्दर्शकाला आपण वाचवू शकलो असतो. या पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये मनमोकळा संवाद ठेवा आणि आपल्या मुलांवर आपले विचार लादण्याऐवजी त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना त्यांचे कामाचे क्षेत्र निवडू द्या असे आवाहन यावेळी डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष विजय हाके, उषा तांबे, कार्याध्यक्ष प्रा. संगिता बाफणा, कार्योपाध्यक्ष मनीष सानप, चिटणीस हेमंत देवरे, सहचिटणीस गणेश भोरे, हेमंत तुपे, खजिनदार अविनाश वाळुंजे, कार्यकारी मंडळ सदस्य कांतीलाल तातेड, विजय काकड, कृष्णा शहाणे, अंतर्गत हिशेब तपासनीस सुनील गायकवाड यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन सौ. मोहिनी भगरे यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, सौ. अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. स्मिता मालपुरे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. भाग्यश्री चौधरी यांनी केले.
कार्यक्रमास विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती उपस्थित होते.
