घरकाम करणाऱ्या मजूरांनी घरातील मनिमंगळसुत्र चोरून नेले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
घरकाम करत असलेल्या मजूर लोकांनी घरातील अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसुत्र चोरून नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात दिनांक ३० जुलै रोजी घडलीय. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात दोघां जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सुनिता सुभाष संसारे, वय ४६ वर्षे, या राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथील आंबीकानगर येथे राहत आहेत. काही दिवसापासून त्यांच्या घराचे दुरूस्तीचे काम चालू आहे. दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान घरदुरुस्तीचे काम चालु असल्याने गवंडी अरुण मोकळ, नितीन पवार तसेच दोन अनोळखी मजुर सुनिता संसारे यांच्या घरी आले.
तेव्हा सुनिता संसारे यांनी त्यांच्या सूनेला चहा करण्यासाठी सांगीतले. आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील अर्धा तोळे वजनाचे मनीमंगळसूत्र काढून घरातील टेबलावर ठेवून त्या अंघोळ करण्यासाठी गेल्या. तो पर्यंत त्यांच्या घरात आलेले इसम चहा पिऊन निघून गेले होते.
सुनिता संसारे या अंघोळ करून आल्या तेव्हा त्यांनी टेबलावर ठेवलेले मनीमंगळसुत्र गायब झाल्याचे दिसले. त्यांनी मनीमंगळसुत्राचा आजुबाजुला शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
सुनिता संसारे यांचे सोन्याचे मनिमंगळसुत्र गवंढी अरुण मोकळ, नितीन पवार व दोन अनोळखी मजुर यांनीच नेले असावे. असा त्यांना संशय आहे. त्यानूसार सुनिता सुभाष संसारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण मोकळ, नितीन पवार, दोन्ही रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी. तसेच इतर दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा रजि. नं. ८४५/२०२३ भादंवि कलम ३८१ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
