Type Here to Get Search Results !

 मंचर - इनामगावच्या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी ६.३९ कोटींचा निधी मंजूर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

 इनामगावच्या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी ६.३९ कोटींचा निधी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश



पुणे - इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावरील उत्खननात सापडलेल्या इसवी सन पूर्व ३५०० काळातील जोर्वेकालीन संस्कृतीच्या अवशेषांचे जतन करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  'एकछत्र योजनेंतर्गत' या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी ६ कोटी ३९ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे इनामगावच्या ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.


इनामगाव ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ गेली अनेक वर्षे ऐतिहासिक व प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या घोडनदीच्या तीरावरील या उत्खनन स्थळाचा विकास व जतन व्हावे यासाठी प्रयत्न करीत होते. सन १९६८ ते १९८२ या काळात डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ केलेल्या उत्खननात हडप्पा, सिंधू, राखीगडी, नेवासा, दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांशी साम्य असणाऱ्या प्राचीन जोर्वेकालीन संस्कृतीचे अवशेष सापडले. जवळपास ६५ एकरावरील हे उत्खनन स्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येतात. त्यामुळे प्राचीन सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या या उत्खनन स्थळाचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी इनामगाव ग्रामपंचायतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली होती.


खासदार डॉ. कोल्हे यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी पत्रव्यवहार करुन इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावरील उत्खननात सापडलेल्या इसवी सन पूर्व जोर्वेकालीन संस्कृतीच्या अवशेषांचे जतन व विकास करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर राज्य पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. विलास वाहाणे यांच्यासमवेतही चर्चा केली होती. खासदार डॉ. कोल्हे यांनी या संदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव  'एकछत्र योजनेंतर्गत' रु. ६ कोटी ३९ लक्ष इतका निधी मंजूर केला आहे.


या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक पुरातन धार्मिक, ऐतिहासिक व वारसास्थळे आहेत. विशेषतः बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय संशोधन स्थळे, प्राचीन कुकडेश्वर मंदिरावर कळस बसविणे आणि इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावरील उत्खनन स्थळाचा विकास व जतन या कामांचा पाठपुरावा मी सातत्याने करत होतो. त्यापैकी इनामगावच्या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी रु. ६.३९ कोटींचा निधी मंजूर झाला असून कुकडेश्वरचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय स्थळाचा विकास व जतन करण्यासाठी निधी मागणीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. माझा पाठपुरावा सुरू असून लवकरच कुकडेश्वर व बोरी बुद्रुक ही दोन्ही कामे मार्गी लागतील असा विश्वास खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.


इनामगावच्या ग्रामस्थांनी उत्खनन स्थळाचे जतन व विकास व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळत नव्हते, मात्र त्यांची मागणी व अपेक्षा पूर्ण करण्यात मला यश मिळाले याचा मला विशेष आनंद असून भविष्यात या ठिकाणी येणाऱ्या अभ्यासक व पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.