Type Here to Get Search Results !

राहुरी - कृषी विद्यापीठाच्या भ्रष्टाचारा बाबत लक्षवेधी मांडणार- आ. प्राजक्त तनपुरे.

 कृषी विद्यापीठाच्या भ्रष्टाचारा बाबत लक्षवेधी मांडणार- आ. प्राजक्त तनपुरे.



विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे पुरावे व मनमानीचा कारभार चव्हाट्यावर.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम खात्यात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत शासन दरबारी संबंधित बाब उघडकीस आणून प्रसंगी लक्षवेधी मांडणार असल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जाहीर केले. विद्यापीठ स्थापनेमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तानी जमीनी दिल्या, त्यांना विद्यापीठात अतिशय वाईट वागणूक मिळत असून प्रकल्पग्रतांनी कुलगुरू यांची कुलगुरू हटावची मागणी प्रकल्पग्रस्त कृती समितीने यावेळी केली.


महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध खात्यात विद्यापीठात २/३ वर्षांपासून कुलगुरू यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार व भ्रष्टाचारा संदर्भात मोठा गाजावाजा झाल्याने तसेच काही तक्रारदारांनी माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे कैफियत मांडल्याने आमदार तनपुरे यांनी बुधवारी थेट विद्यापीठात जाऊन संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व तक्रारदार यांची संयुक्तरीत्या आमने-सामने बैठकच घेतली.


 या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाली व सोक्षमोक्ष लावण्याचा प्रसंग गुदरला. विशेषता विद्यापीठाच्या बांधकाम विभागातील विद्यापीठ अभियंता यांच्या मनमानी कारभार संदर्भात सर्वाधिक तक्रारी होत्या. सर्वांच्या समक्ष तक्रार निवारण होत असताना विद्यापीठ अभियांता यांची प्रचंड गोची झाली. असमाधानकारक उत्तरे व खुलासे झाल्याने तनपुरे यांचा पारा अधिकच वाढला. यातच विद्यापीठात कामे केलेल्या ठेकेदारांनी भ्रष्टाचाराचे पुरावे व मनमानीचा नियमबाह्य कारभार चव्हाट्यावर आणल्याने भलतीच अडचण झाली.


 कागदोपत्री पुरावे दाखविल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अभियंता या पदावर काही तरुण कार्यरत होते. त्यांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले व मर्जीतील लोकांना त्या पदावर बसविले. संबंधित कंत्राटी अभियंता यांनी कशाप्रकारे अन्याय झाला याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर आमदार तनपुरे अधिकच आक्रमक झाले. कोणत्या नियमानुसार त्यांना कामावरून काढून टाकले. असा जाब विचारला असता विद्यापीठ अभियंता निर्रूत्तर झाले. 


या तरुणांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर अन्याय का केला. असा प्रश्न उपस्थित केला. या तरुणांना आजच्या आजच कंत्राटी पदावर कामावर घेण्याचा हट्ट धरला. जो पर्यंत कमी केलेल्या कंत्राटी अभियंताचा प्रश्न मार्गी लागत नाही, तो पर्यंत येथून मी हलणार नाही. अशी भूमिका आमदार तनपुरे यांनी घेतली. या चर्चेनंतर या तरुणांना आजच कामावर घेण्याचे कुलसचिव विठ्ठल शिर्के यांना जाहीर करावे लागले.


बांधकाम विभागातील ठेकेदारांनाही हेतूत डावलले जाते. भूमिपुत्र असतानाही त्यांना कामे मिळत नाहीत. उलट ज्यांच्याकडे कोणताही परवाना नाही. शासकीय नियमानुसार लागणारी कागदपत्रे नाही. जीएसटी नंबर नाही. अशांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात आली. हे सप्रमाण सिद्ध झाल्याने यासंबंधी आगामी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून अन्यायकारक ठरलेल्या घटकांना न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सभागृहात स्पष्ट केले.


 विद्यापीठाच्या बांधकाम खात्यात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत शासन दरबारी संबंधित बाब उघड आणून प्रसंगी लक्षवेधी मांडणार असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना कामे देण्याचा अध्यादेश काढलेला असतानाही बांधकाम विभाग मात्र एकाही सुशिक्षित बेरोजगाराला विद्यापीठ अंतर्गत विद्युत व स्थापत्य कामे दिली जात नाही.


 याकडे संबंधितांनी लक्ष वेधले असता विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांची चांगलीच तारांबळ उडाली. बाहेरील ठेकेदार आणून त्यांच्याकडून कामे करून घेण्यात त्यांना अधिकच रस होता. याचे गौड बंगाल काय? मर्जीतील कंत्राटी अभियांता नेमणूक करून त्यांच्याच नातेवाईकांना कोट्यावधी रुपयांची कामे देऊन मोठा गफला झाला असल्याचा थेट आरोप ठेकेदारांनी सभागृहातच केला. 


विद्यापीठाच्या उभारणीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यावरही अन्यायकारक प्रसंग ओढावले आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारी करूनही उपयोग झाला नसल्याची बाब प्रकल्पग्रस्तांनी सभागृहात उपस्थित केली. विद्यापीठातील सुरक्षा विभागही प्रकल्पग्रस्तांना, पत्रकार सामान्य शेतकऱ्यांना आडमुठे पणाची वागणूक देत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यापीठाच्या अंतर्गत हजारो तक्रारी वाढत चालल्याने आमदार तनपुरे यांनी दखल घेत जवळपास चार ते पाच तास झाडाझडती घेतली.


 या बैठकीस कुलसचिव विठ्ठल शिर्के नियंत्रक सदाशिव पाटील विभाग प्रमुख महानंद माने आनंद सोळुंके उपस्थित होते. कुलसचिव विठ्ठल शिर्के यांनी समाधानकारक तोडगा काढण्याचे व काही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त व तक्रारदार यांनी थेट कुलगुरू हटाव मोहीम हाती घेण्याचे आवाहन केले. 


विद्यापीठातील आर्थिक व्यवहार बाहेरील एक नामांकित व्यक्ती करत असून त्याचा मोठा फटका विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार व ठेकेदार यांना बसला आहे. मर्जीतील लोकांना हाताशी धरून समांतर यंत्रणा उभी करून बेमालूमपणे भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप भर सभागृहात झाला.