Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतकरी संघटनेच्या वतीने १२ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन

 शेतकरी संघटनेच्या वतीने १२ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने आज महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व नायब तहसीलदार पुनम दंडिले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, संपूर्ण जगात भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु सध्या राज्य व केंद्र शासन राबवत असलेल्या कृषि विरोधी धोरणांमुळे शेतकरी पूर्णतः अडचणीत आलेला आहे. आधीच आसमानी व आर्थिक संकटामुळे हतबल झालेला शेतकरी शासनाच्या जुलमी व कृषि विरोधी निर्णयांमुळे अधिक आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचत चाललेला आहे.


 केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या पुढील मागण्यां संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता राहुरी येथील कृषि उत्पन्न बाजार समिती समोर नगर- मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.


१) दूधाला ३.५ फॅट / ८.५ एसएनएफ साठी प्रती लिटर किमान ३५ रूपये दर मिळावा. २) केंद्र शासनाने कांद्याची अचानक केलेली निर्यात बंदी तात्काळ उठवावी. ३) साखर कारखान्यांवर इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी त्वरीत मागे घ्यावी. ४) मागील वर्षी अवकाळीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी. 


आदि मागण्या असून या संदर्भात राज्य व केंद्र शासनाने त्वरीत मागण्या मान्य कराव्या. यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार. मागण्या मान्य न झाल्यास पुढील होणाऱ्या परिणामांना शासन स्वतः जबाबदार राहील. असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलन प्रसंगी तालूक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले. 


दिलेल्या निवेदनावर रविंद्र मोरे, राजूभाऊ शेटे, दिपक तनपुरे, दिनकर पवार, सतिष पवार, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, प्रभाकर जाधव, संदिप आढाव, प्रमोद पवार, जुगल गोसावी, संदिप शिरसाठ, राहुल करपे, सचिन म्हसे, सचिन पवळे, रामभाऊ गुरसाळ, किशोर वराळे, सुनिल इंगळे, सुधीर गावडे, रंगनाथ जाधव आदिंच्या सह्या आहेत.