महात्मा फुलेंनी आत्मसन्मानाचे आंदोलन उभारले- डी. आर. ओहोळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्यावर झालेल्या अन्याय व अपमानाचा बदला घेण्यासाठी कारणांची मीमांसा केली. शिक्षण हे अज्ञानाचे मूळ आहे. याचा शोध घेऊन १८१८ साली बहुजनांसाठी पहिली शाळा सुरु केली. सर्वप्रथम आपल्या पत्नीस शिक्षित केले. शिक्षण देऊन महिलांना आत्मनिर्भर बनवले.
१८६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली व पहिली दहा दिवसांची शिवजयंती साजरी केली. फुलेंनी महाराजांवर एक हजार ओळींचा तर दुसरा पोवाडा महमंद पैगंबर यांच्यावर लिहिला. बहुजन समाजाला मोफत शिक्षण व साहित्य दिले. असत्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला सत्यशोधक समाज दिला. आजही सत्यशोधक समाजाचे कार्य बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा निरंतर करत असल्याचे मत बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ यांनी श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हास्तरीय सत्यशोधक संमेलनाप्रसंगी व्यक्त केले.
संमेलनाचे उद्घाटन इंजि. योगेश बनसोडे यांनी केले. या संमेलनात सत्यशोधक समाज स्थापने मागील उद्देश, सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे, ६२ हजार शाळांचे खाजगीकरण आणि कंत्राटी नोकरी भरती हे महाराष्ट्र सरकारचे बहुजन समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र, जातीनिहाय जनगणना करणार नाही केंद्र सरकार व महाराष्ट्रात शासनाच्या षड्यंत्राचा पर्दाफाश अशा विविध ज्वलंत विषयावर चर्चा झाली.
विशेष अतिथी छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाचे एड. शिरीष कांबळे, अ. भा. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, क्रांतीवीर भगतसिंग ब्रिगेडचे राज्य संघटक जीवन सुरडे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हा संयोजक अनिल पावटे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजय संसारे, महासचिव फ्रान्सिस शेळके, संघटक सुधाकर बागुल, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, कुमार भोरुंडे, डॉ. अशोक शेळके, प्रभाकर ब्राह्मणे आदींनी मेहनत घेतली. प्रास्तविक संजय संसारे यांनी तर सूत्रसंचालन आर. एम. धनवडे यांनी केले. कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थित होते.
