भोजनाचे ताट विषमुक्त झाले तर खऱ्या अर्थाने माझे काम सार्थकी लागेल- पद्मश्री राहीबाई पोपेरे.
गुणवंत विद्यार्थ्यांना पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ. उषा तनपुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला पिकवावा. प्रत्येक भोजनाचे ताट विषमुक्त झाले. तर खऱ्या अर्थाने माझे काम सार्थकी लागेल. असे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी सांगितले.
राहुरी फॅक्टरी येथे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक व उपप्राचार्य (स्व.) साराम्मा जॉय स्मरणार्थ दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान प्रसंगी पद्मश्री राहीबाई पोपेरे बोलत होत्या. राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डॉ. उषा तनपुरे अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य फादर सॅन्टो, फादर थॉमस, फादर जेम्स उपस्थित होते.
पद्मश्री राहीबाई म्हणाल्या, "देशी बियाण्यांचे १५४ वाण रजिस्टर केले आहेत. प्रत्येक गावात एक देशी बियाण्यांची बँक असावी. त्यासाठी प्रत्येक गावात माझ्यासारखी राहीबाई तयार व्हावी. आपण बाजारातून विषारी भाजीपाला विकत आणतो. त्यातून आजार वाढले आहेत."
"प्रत्येकाने दारात परसबाग, किचन गार्डन करून विषमुक्त भाजीपाला पिकवावा. आहारात भरडधान्य, रानभाज्यांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी. मातीचे आरोग्य सुधारले तरच मानवी आरोग्य सुधारणार आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करतांना निसर्गाला धरून काम करावे." असेही राहीबाई यांनी सांगितले.
डी पॉल स्कूलच्या उपप्राचार्य (स्व.) साराम्मा जॉय स्मरणार्थ दहावीचे गुणवंत विद्यार्थी स्वराली वरकड (९८.८०%), सृष्टी चुत्तर (९७.८०%), संस्कार सोनटक्के (९७.२०%), कृपा अनारसे (९६.२०%), तृप्ती बाचकर (९५.८०%) यांचा सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
