निर्मळ पिंपरी येथील पिडीत कुटुंबाला रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट.
पिडीत कुटूंबांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन सेना तत्पर राहणार- राजूभाऊ आढाव.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहता तालूक्यातील निर्मळ पिंपरी येथे ६ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास दोन दलित कुटुंबावर सुमारे ४०० ते ५०० जणांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केला. या घटने नंतर भयभीत झालेल्या कुटुंबांची रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिर दिला.
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून विरोधात काम केल्याचा राग मनामध्ये धरून सुड बुध्दीने ४०० ते ५०० जातीयवादी लोकांनी पूर्व नियोजित कट रचून गावामध्ये ग्रामसभा घेवून या करण कोळगे कुटूंबांवर बहिष्कार टाकून गावामधून हाकलून देण्याचा ठराव केला.
तसेच दि. ६ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजताच्या दरम्यान दलीत वस्तीच्या लाईट बंद करून दोन कुटूंबांवर हल्ला करून वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. घरातील काही वस्तू जाळण्यात आल्या. घराची आणि गाड्यांची तोडफोड केली. लहान मुलीला गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विनयभंग करून तिला मारहाण केली.
या घरांची खैरलांजी करा, या महीला मुलीचे मनिपूर घडवा. असे म्हणून जाळा तोडा म्हणून दहशत निर्माण केली. दोन्ही कुटूंब घरामध्ये कड्याकुलपे लावून बसली होती. दारावर तलवारी दगडे मारीत होती. तेथे पोलीस आले तर जमावातील लोकांनी पोलीसांना सुध्दा मारहाण करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. पोलीस आले नसते तर फार मोठा अनर्थ झाला असता.
सदरचे कुटूंब हे लोणी पोलीस स्टेशनला गेले असता तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक आठरे, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी त्यांची तात्काळ फिर्याद न घेता ९ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येवून दखलपात्र गुन्हे दाखल न करता, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर करत आहे.
सदरचा मतदार संघ हा राज्याचे महसुलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांचा आहे. व खासदार सुजय विखे यांच्या हाकेच्या अंतरावर असलेले गाव असुन सदरचे गाव हे शिर्डी लोकसभा राखीव मतदार संघात आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा हा संघ आहे. पण लोखंडे यांनी व सुजय विखे यांनी सदरच्या घटनास्थळी भेट दिली नाही. राधाकृष्ण विखे यांनी गावाला भेट दिली. परंतू त्यांनी प्रथम प्राधान्य हल्लेखोर गावकरी यांना देवून कुणावर ही अन्याय होवू देणार नाही. असे आश्वासन त्यांना दिले.
तेथील सभा संपल्या नंतर आरपीआय चे सुरेंद्र थोरात, बाळासाहेब गायकवाड, पप्पु बनसोडे, शिरीष गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव, जिल्हा ऊपप्रमुख भारत भांबळ, श्रीरामपूर तालुका महासचिव संजय अमोलीक व इतर असंख्य पदाधिकारी यांनी विखे यांना व जिल्हाधिकारी डॉ. सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला घटनास्थळी घेवून गेले व वस्तूस्थिती दाखवून आरोपींना लवकरात लवकर अटक करावे, असे सांगितले.
या अमानवी अमानुष घडलेल्या घटनेचा रिपब्लिकन सेना जाहीर निषेध करून सदर पिडीत कुटुंबास धीर देण्यासाठी घटनास्थळी जावून विचारपूस केली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख राजू आढाव, ऊपप्रमुख भारत भांबळ श्रीरामपूर तालुका महासचिव संजय अमोलीक व इतर असंख्य पदाधिकारी यांनी भेट दिली व वस्तूस्थिती जाणून घेवून धीर दिला.

