Type Here to Get Search Results !

आंबेगाव - मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट

मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट

प्रतिनिधि - अमोल जाधव 

शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा तिढा सुटत नसताना या मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुक असलेले मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेत मनमोकळा संवाद साधत चर्चा केली असल्याचं बोलले जात आहे. दरम्यान त्यांच्या या भेटीने आढळराव पाटील व मोहिते पाटील यांच्यातील दरी दूर होऊन मनोमिलन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून खेडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात कार्यरत आहेत राज्यात शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे सत्तेत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. तसेच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यावर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवणार अशी चर्चा सुरू असताना खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त करत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर त्यांचे काम करायचे की नाही हा माझा वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी मला खूप त्रास दिला आहे असे वक्तव्य केले होते त्यानंतर माजी खासदार आढळराव पाटील यांनीही आमदार दिलीप मोहिते व आमच्यात राजकीय हेवेदावे आहेत. मात्र त्यांचे काही गैरसमज असतील तर ते भेटून दूर करू असे म्हणाले होते त्यानंतर आता मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारामुळे आढळराव पाटील यांचा प्रवेश लांबणीवर पडला असल्याची चर्चा होत असताना आढळराव पाटील यांनी मोहिते पाटलांची भेट घेतल्याने मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे माजी खासदार आढळराव पाटील व विद्यमान आमदार मोहिते पाटील यांच्यातील निर्माण झालेली दरी दूर होऊन मनोमिलन होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे