तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार -अरुण गिरे
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे गेल्या अनेक वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी काम करत असून खासदार नसतानाही त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांनाच उमेदवारी मिळणे गरजेचे असून उमेदवारीसाठी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यास मीही त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी भूमिका शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी जाहीर केली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षांकडून अद्याप जागा वाटपाचा निर्णय झाला नसून पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे समजले जाणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रयत्न करत असुन निवडणूक लढवण्याचे तयारीत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत तर दुसरीकडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील त्यांच्या विरोधात लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी दावा ठोकला आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही जागा लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. दरम्यान याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय, विश्वासु सहकारी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आढळराव पाटील हे गेली अनेक वर्ष मतदारसंघातील जनतेसाठी काम करत आहे खासदार नसतानाही त्यांनी मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासु सहकारी ते आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून अमोल कोल्हे यांना आव्हान द्यायचे असेल तर आढळराव पाटलांशिवाय पर्याय नाही. पक्षात काम करत असताना ते मला नेहमी मानसन्मान देतात त्यांच्याबरोबर मी गेले अनेक वर्ष काम करत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णय हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यास मीही कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या पाठीशी उभा राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे अरुण गिरे यांनी सांगितले आहे.


