पुणे नाशिक महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वाहन चालक हैराण
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विद्यमान खासदारांनी काय केले ?
प्रतिनिधि : अमोल जाधव
पुणे नाशिक महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक वैतागले असून मागील लोकसभा निवडणुकीचे वेळी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे वाहतूक कोंडीत अडकलेल्या चे फोटो व्हायरल करून मत मागणारे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय केले असा संतप्त सवाल शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार विचारत आहे.
पुणे व नाशिक शहरांना जोडणारा मुख्य महामार्ग असलेल्या पुणे नाशिक महामार्गामुळे हजारो गावे, शहरे एकमेकांना जोडली गेली असून नागरिक, विद्यार्थी, महिला यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पुणे नाशिक महामार्ग महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. पुणे नाशिक महामार्गावर मुख्य करून चाकण, मोशी, भोसरी, आळंदी फाटा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांना तासन-तास महामार्गावर उभे राहावे लागत आहेत. या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करू असे आश्वासन विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिले होते. मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार असताना त्यांच्यावर वाहतूक कोंडीवरून अनेकदा टीका केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आढळराव पाटील यांचे वाहतूक कोंडीत अडकलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन त्यांना टार्गेट करत होते मात्र याच कार्यकर्त्यांना गेल्या पाच वर्षात पुणे नाशिक महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी दिसली नाही ही मोठी शोकांतिका आहे. मला निवडून द्या मी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवतो माझे कलाक्षेत्र सोडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी नेहमीच उपलब्ध राहील, मतदारसंघात लक्ष देईल, असे गोड बोलून निवडून आलेले विद्यमान खासदारांकडून गेल्या पाच वर्षात हा प्रश्न सोडवण्यात आला नाही.
शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक तरुण नागरिक महिला विद्यार्थी कामानिमित्त, शिक्षणासाठी पुणे येथे जात असतात. मंचर येथुन पुणे येथे जाण्यासाठी साधारणपणे दोन तास लागतात मात्र वाहतूक कोंडी वाढल्याने आता तीन ते साडेतीन तास लागत आहेत. चाकण, मोशी येथे तासनतास वाहतूक कोंडीत वाहने उभी करावी लागत आहे. पाच वर्षांपूर्वीपेक्षा आताची परिस्थिती खुपच वाईट आहे.
आम्ही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून दिले ते यासाठीच का असा सवाल आता मतदार उपस्थित करत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गोड बोलून जनतेची दिशाभूल केली असून गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील समस्याबाबत कोणतेही ठोस काम केलेले नाही त्यामुळे जनता त्यांना यावेळी नक्कीच घरी बसवेल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
