टारगटांनो सावधान अन्यथा पोलीस कारवाई- पो. नि. संजय ठेंगे.
महाविद्यालयात पोलिसांची झाडझडती, टवाळखोरांना कारवाईचा इशारा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील स्व. रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य महाविद्यालयामध्ये सकाळच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस पथकाने अचानक जाऊन झाडझडती घेतली. कॉलेजमध्ये विना ओळखपत्र असणाऱ्या तरुणांना ताब्यात घेत कसुन चौकशी केली. तसेच कॉलेजच्या पाठीमागच्या बाजुस काळ्या काचेच्या मारुती चार चाकी गाडीमध्ये एक विद्यार्थी अन् विद्यार्थिनी संशयितरित्या आढळून आल्याने पोलिसांनी सदर विद्यार्थी आणि त्याच्या नातेवाईकांची चांगलीच कान-उघडणी केली आहे. सदर कारवाईने मात्र टारगट तसेच कॉलेज परिसरामध्ये गैरकृत्य करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
दिवसेंदिवस शाळा- महाविद्यालयामध्ये मुलींबाबत गैरकृत्य घडत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी खबरदारी घेत तालुक्यातील शाळा तसेच कॉलेजमध्ये अचानक भेटी देत तेथील चौकशी करणे सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस पथकाने राहुरी महाविद्यालयात धाव घेतली. या दरम्यान काही टारगट तरुण देखील पोलिसांना आढळून आले. त्यांची देखील चौकशी पोलिसांनी केली असून त्यांच्या पालकांना बोलवून योग्य त्या सूचना दिल्या.
तसेच कॉलेज परिसरातील पाठीमागच्या निर्जन स्थळी एका चारचाकी गाडीत एक तरुण आणि एक तरुणी गैरकृत्य करत असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांची अन विद्यार्थीनीची तसेच शिक्षकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या पालकांना देखील बोलावून घेत हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. सदर कारवाईने मात्र कॉलेज परिसरात चांगलाच धाक निर्माण झाला आहे.
अचानक अशा होणाऱ्या कारवाईंचे पालक पालक वर्गातून स्वागत केले जात आहे. कुठल्याही विद्यार्थिनींना टारगट मुलांचा त्रास होत असेल तसेच काही अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
