Type Here to Get Search Results !

राहुरी - राहुरी नगरपालिका शिक्षिका मनिषा गिरी यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप.

 



राहुरी नगरपालिका शिक्षिका मनिषा गिरी यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील नगरपरिषदच्या नूतन मराठी शाळा नं. ९, येवले वस्ती या शाळेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षिका श्रीम. मनिषा रामकिसन गिरी यांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५-२६ साठी निवड करण्यात आली. 


मनिषा गिरी यांनी शाळेतील विद्यार्थिनीं यांच्या भविष्यातील सुरक्षितता लक्षात घेवून प्रोजेक्ट सादर केलेला आहे. त्यांच्या प्रोजेक्ट चे नाव "सक्षम कवच: स्वसंरक्षणाचे तंत्र आणि कौशल्ये" असे आहे. "सक्षम कवच: स्वसंरक्षणाचे तंत्र आणि कौशल्ये" हा उपक्रम मुलींच्या सुरक्षितता, आत्मविश्वास, आणि सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे मुली फक्त स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठीही एक सशक्त आदर्श बनतील, आणि भविष्यातील आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाऊ शकतील. या प्रोजेक्ट वर त्या वर्षभर काम करणार आहेत. 


यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने  देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' (२०२५-२६)  निकालाची घोषणा १ डिसेंबर २०२४  रोजी  करण्यात आली. ही फेलोशिप कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील नवोदितांना दरवर्षी देण्यात येते. फेलोशिप निवड समितीने यंदा ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ७०, ‘शरद पवार लिटरेचर फेलोशिप' साठी १२ तर 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' साठी ३० अशा एकूण ११२ फेलोंची निवड केली आहे. शिक्षण क्षेत्रात वेगळं काही करू या शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावं, तसंच मुलभूत संशोधनास वाव मिळावा, हा या फेलोशिपचा मुख्य हेतू आहे.


यापूर्वी शिक्षिका मनिषा गिरी यांनी शाळेवर गृहपाठासाठी एसएमएस प्रणाली राबवली. तसेच त्यांनी scert पुणे येथे डिजिटल शैक्षणिक साहित्यचे मित्रा ॲपवर काम केले आहे व शासनाच्या दीक्षा ॲपसाठी व्हिडिओ निर्मिती केली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ई - बालभारती येथे व्हर्चुअल पाठाद्वारे अध्यापन केले आहे. NCERT, दिल्ली येथे सायबर सुरक्षाच्या विविध स्पर्धेत त्या मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय परीक्षक म्हणून काम करत आहेत. याच सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना माहिती तंत्रज्ञानाचा राष्ट्रीय पुरस्कार ही मिळालेला आहे.


या यशाबद्दल राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मा. उषाताई तनपुरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, रा.न.पा. शि. मंडळाचे प्रशासनाधिकारी शिवाजी कराड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार पालवे, सर्व सहकारी शिक्षक वृंद, सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.


रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सर्व फेलोशिप प्राप्त फेलोंचा फेलोशिप प्रदान सोहळा संपन्न होणार आहे.