भामट्यांनी रात्रीच्या दरम्यान चारचाकी वाहनाचे चारही चाक चोरुन नेले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे रात्रीच्या दरम्यान अज्ञात भामट्यांनी घरासमोर लावलेल्या चारचाकी वाहनाचे चारही नवीन चाके चोरुन नेल्याची घटना दि. ६ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे गुहा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दिलीप शेरुजी बोरुडे, वय ५४ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याकडे एम एच १२ इएक्स ६०२४ ही स्विफ्ट चारचाकी गाडी आहे. सदर स्विफ्ट गाडीचे चारही टायर दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी सियाट कंपनीचे टाकले होते.
दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेचे सुमारास बोरुडे यांची स्विफ्ट गाडी त्यांच्या घरासमोर लावली होती. त्यांनतर दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजेचे सुमारास दिलीप बोरुडे हे झोपेतून उठुन घराबाहेर आले. तेव्हा त्यांच्या स्विफ्ट गाडी दगडांवर उभी करून तीचे चारही टायर डिस्कसह चोरुन नेल्याचे त्यांना दिसून आले.
दिलीप शेरुजी बोरुडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुध्द गुन्हा रजि. नं. १२६१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
