शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच पद गेले.
लोकनियुक्त सरपंच शेंडगे यांचे पद अपात्र, जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आदेश.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांचे पद अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सदर आदेश पारित केले आहेत.
घोरपडवाडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर २०२३ मध्ये झाली होती. यावेळी लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेडगे यांनी माजी सरपंच सयाजी श्रीराम यांचा अवघ्या ३५ मतांनी पराभव केला होता. सरपंच शेंडगे यांच्या गटाचे ४ तर पराभूत उमेदवार श्रीराम यांच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले होते. लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेंडगे यांचे वडील रावसाहेब मारुती शेंडगे यांनी अ. नं. ८३ मध्ये अतिक्रमण केल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे संयुक्त यादी तहसीलदार राहुरी यांना सादर केलेल्या यादीमध्ये अनिवासी प्रयोजन गट नंबर १०, जुना सर्वे नंबर २४०/६, गटाचे एकूण क्षेत्रफळ १८.१३, अतिक्रमित क्षेत्र ८०० चौ. फू. असले बाबत २०२२ मध्ये अहवाल पाठविला आला होता.
सरपंच शेंडगे यांची गट नंबर १० लगत शेती आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करून कांदा चाळ उभारून गट नंबर १० मध्ये अतिक्रमण केले आहे. तरी लोकनियुक्त सरपंच शेंडगे यांना पदावरून अपात्र करण्यात यावे. याबाबत पराभूत उमेदवार सयाजी कारभारी श्रीराम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक २५/२०२४ नुसार अर्ज सादर केला होता.
त्यानुसार अर्जदार व सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यांनी पुराव्या कामी दाखल केलेले कागदपत्रे व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहुरी यांचा अहवाल व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६० कलम १४ (ज-३) ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे अशी व्यक्ती, तरतूद पाहता ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सामनेवाले न. एक मैनाबापू रावसाहेब शेडगे यांचे वडील नामे रावसाहेब मारुती शेंडगे यांना शासकीय गट नंबर १० खाते क्रमांक ८८६ चे एकूण १८.१३ नमूद क्षेत्रामधील १०७ अतिक्रमण धारक यांचे दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजीचे अतिक्रमण धारकांमध्ये नोटीस बजावली असून प्रत्यक्ष अतिक्रमण करून पत्रा शेड बांधकाम केले असल्याचे दिसून येत आहे.
तसेच शिधापत्रिका, संदर्भ रजिस्टर व ऑनलाईन मध्ये लोकनियुक्त सरपंच व त्यांचे वडील एकत्र असले बाबत दिसून येत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांचे वडिलांनी शासकीय गट नंबर १० मध्ये अतिक्रमण केले असल्याचे उपलब्ध कागद पत्रावरून दिसून येत असल्याने त्यांचे पद अपात्र करण्याचे आदेश पारित करीत असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निकालात म्हटले आहे.
