राहुरीतील आढाव वकील दाम्पत्य खून प्रकरणाला नवे वळण.
माफीच्या साक्षीदार हर्षल ढोकणे याने सांगितला घटनाक्रम.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राज्यामध्ये गाजलेल्या राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाची सुनावणी काल अहिल्यानगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची आज न्यायालयासमोर तपासणी झाली व त्याने या हत्याकांडाचा घटनाक्रम मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर मांडला. त्याने सांगितलेल्या घटनाक्रमामुळे सर्वांनाच धक्का बसला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याची तपासणी घेतली.
या हत्याकांड प्रकरणांमध्ये आरोपी हर्षल ढोकणे याने सरकारी पक्षाला सर्व माहिती आपण देण्यास तयार आहोत, असे सांगितल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर हजर केले. हर्षलने यावेळी त्याने न्यायालयासमोर सर्व हत्याकांडाचा पहिल्या पासूनचा घटनाक्रम मांडला. यामध्ये त्यांनी आपण एस. वाय. बीकॉम ला शिक्षण घेत असून आपलं मूळ गाव उंबरे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याने आपली ओळख बबन मोरे यांच्याशी झाली व आपण त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेतील चारही इतर आरोपींना आपण ओळखत आहोत असे म्हणत त्यांनी त्यांची गावाची ठिकाणे व नावे यावेळी न्यायालयासमोर सांगितले.
यावेळी हर्षल ढोकणे हा प्रसाद शुगर साखर कारखान्यात ऊस काट्यावर गुन्हा घडण्याच्या तीन महिने अगोदरपासून नोकरी करत असल्याचे त्याने सांगितले. २४ जानेवारी २०२४ रोजी बबन मोरे यांचा मला फोन आला की “उद्या आपल्याला गेम करायचा आहे. तू रॉयल पॅलेस या ठिकाणी ये”, असे सांगितले. त्याचा आपल्याला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मी परत बबनला फोन केला तेव्हा बबन याने तू ये आपल्याला सर्वांना एक गेम करायचा आहे. त्यात तुला पण पैसे मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याने नंतर हा फोन शुभम महाडिक याला दिला. ठरलेल्या ठिकाणी आल्यावर शुभमने वकिलांना फोन लावण्यास सांगितले. व म्हणाला पाथर्डी कोर्टात जामिनासाठी जायचे आहे. त्यानंतर आम्ही पाच जण गाडीमध्ये बसलो. आम्हाला मोबाईल बंद करण्यास सांगितले. नंतर आम्ही सर्वजण राहुरी न्यायालयासमोर आलो. त्यानंतर किरण व शुभम हे वकिलांना आणण्यासाठी गेले. वकील आल्यानंतर त्यांना कारमध्ये पुढे बसवले व आम्ही चार जण मागे बसलो. त्यानंतर आम्ही निघत असताना किरण कार चालवत होता. ब्राह्मणीच्या अलीकडे एका हॉटेलच्या जवळ निर्जण स्थळी त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर वकील हे कारमध्ये बसले असताना किरण याने त्यांचे हातपाय दोरीने बांधायला सुरुवात केली. त्यांनी याला विरोध केला. त्यावेळी किरण याने वकिलाला मारहाण केली.
यावेळी किरण याने वकिलांना सांगितले की तुमचा मुलगा साई याने आळेफाटा या ठिकाणी मुलीला पळवून आणले आहे. हे प्रकरण मिटवायचे असेल तर १० लाख रुपये द्या. वकील यांनी मी मुलाला बोलतो, असे ते म्हणाले. त्यानंतर किरण याने त्यांना सांगितले की, तुमच्या पत्नीला बोलावून घ्या. तिला मोहटादेवीला जायचं आहे, असे सांगा. त्यानंतर वकिलाच्या फोन वरून त्यांच्या पत्नीला फोन वरून शुभम तुला घ्यायला येईल असे सांगितले. त्यावरून आम्ही सर्वजण पुन्हा एका हॉटेलमध्ये गेलो. त्यानंतर एक जण राहुरी येथील न्यायालयात त्यांना आणायला गेला. त्यांना घेऊन येत असताना आम्ही पुन्हा ब्राह्मणी जवळ एक निर्जण स्थळी आलो. त्यानंतर कारमध्ये त्यांना त्यांचे पती बांधून ठेवल्याचे दिसले व त्यांनी त्या वेळेला कारमध्ये बसण्यास नकार दिला. त्यावेळेला किरण याने त्यांना ढकलून कारमध्ये बसविले. मात्र, त्यांच्याकडे हात बांधण्यासाठी काही नसल्याने त्यातील एकाने रुमाल आणून दिला. कोणता रुमाल होता, त्याची ओळख तुम्हाला आहे का? असे वकील उज्वल निकम यांनी त्याला विचारले. व न्यायालयासमोर तो सीलबंद केलेला रुमाल यावेळी दाखवण्यात आला व तो त्याने ओळखला. यावेळी ढोकणे याने आम्ही ज्या वेळेला कारमध्ये होतो. त्या वेळेला किरण याने राजाराम आढाव व मनीषा आढाव तुम्हीच ना, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांने होकार दिला. तुमचा मुलगा साई आहे ना असे त्यांना विचारले.
त्यानंतर ते वकिलाच्या बंगल्यावर जाण्यास निघाले. त्यापूर्वी एकजण वकिलाच्या बंगल्याजवळ गेला. तिथे वकिलाचा कामगार होता. वकिलाला फोन करून कामगारास जाण्यास सांगण्यात आले. परंतु कामगार तिथेच होता. संशयित आरोपीचा पुन्हा वकिलाला फोन आला की तुमचा कामगार अजून तिथेच आहे त्याला जाण्यास सांगा. त्यानंतर वकिलाने पुन्हा फोन करून कामगारास जाण्यास सांगितले. यानंतर वकील दाम्पत्याला घेऊन आरोपी त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. असे माफीचा साक्षीदार असलेला संशयित आरोपी हर्षल ढोकणे याने सांगितले. मात्र ढोकणे याला चक्कर आल्याने न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुढील सुनावणी आज मंगळवारी होणार आहे. यावेळी मुख्य आरोपींतर्फे नाशिकचे वकील सतीश वाणी हे बाजू मांडत असून वकील वैभव बागुल, वकील जर्जरी शेख, वकील कश्यप तरकसे हे इतर आरोपींतर्फे काम पाहत आहे.
