लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेंडगे यांचे पद अपात्रच.
जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आदेश अप्पर आयुक्त, नाशिक यांच्याकडून कायम.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांचे पद अपात्र बाबतचे अपील नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी अमान्य केले असून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेले आदेश कायम केले आहेत. त्यामूळे अखेर सरपंच पद अपात्रच ठरले आहे.
घोरपडवाडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर 2023 मध्ये झाली होती. यावेळी लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेडगे यांनी माजी सरपंच सयाजी श्रीराम यांचा अवघ्या 35 मतांनी पराभव केला होता. सरपंच शेंडगे यांच्या गटाचे 4 तर पराभूत उमेदवार श्रीराम यांच्या गटाचे 5 सदस्य निवडून आले होते. लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेंडगे यांचे वडील रावसाहेब मारुती शेंडगे यांनी अ.नं. 83 मध्ये अतिक्रमण केल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे संयुक्त यादी तहसीलदार राहुरी यांना सादर केलेल्या यादीमध्ये अनिवासी प्रयोजन गट नंबर 10, जुना सर्वे नंबर 240/6, गटाचे एकूण क्षेत्रफळ 18.13, अतिक्रमित क्षेत्र 800 चौ.फू. असले बाबत 2022 मध्ये अहवाल पाठविला आला होता. सरपंच शेंडगे यांची गट नंबर 10 लगत शेती आहे त्यांनी पदाचा गैरवापर करून कांदा चाळ उभारून गट नंबर 10 मध्ये अतिक्रमण केले आहे तरी लोकनियुक्त सरपंच शेंडगे यांना पदावरून अपात्र करण्यात यावे याबाबत पराभूत उमेदवार सयाजी कारभारी श्रीराम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 25/2024 नुसार अर्ज सादर केला होता.
त्यानुसार अर्जदार व सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व त्यांनी पुराव्या कामी दाखल केलेले कागदपत्रे व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहुरी यांचा अहवाल व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 कलम 14 (ज-3) ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे अशी व्यक्ती, तरतूद पाहता ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांचे वडिलांनी शासकीय गट नंबर 10 मध्ये अतिक्रमण केले असल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येत असल्याने त्यांचे पद अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दि.9 डिसेंबर 2024 रोजी दिले होते.
या निकाला विरोधात मैनाबापू शेंडगे यांनी क्र.128/2024 नुसार विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. परंतु अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी सदर अपील फेटाळून लावत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आदेश कायम करण्यात येत असल्याचे निकालात म्हटले आहे. दरम्यान अप्पर आयुक्त, नाशिक यांच्या निर्णयामुळे सरपंच पद रिक्त ठरले असून पुढील निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.