थापलिंग मंदिर जीर्णोद्धारासाठी ५० लाख देणार ; आ. दिलीप वळसे पाटील यांची माहिती
नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग गडावरील नियोजित खंडोबा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पौष पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि. १३) श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा यात्रेनिमित्त आमदार वळसे पाटील यांनी देवाचे दर्शन घेत नवसाचे बैलगाडे पाहण्याचा आनंद घेतला, त्या वेळी ते बोलत होते. विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, संजय गवारी, प्रकाश घोलप, दत्ताशेठ थोरात, अशोक आदक, सुहास बाणखेले, रमेश खिलारी, सचिन पानसरे, शिवाजीराव लोंढे, वैभव उंडे आदी उपस्थित होते.
आमदार वळसे पाटील म्हणाले, थापलिंग खंडोबा हे श्रद्धास्थान आहे. मी आठवी-नववीत असल्यापासून दरवर्षी थापलिंग यात्रेला येत खंडोबा देवाचे दर्शन घेतो. आमदार, मंत्री म्हणून काम करत असताना आपण शासकीय निधीतून थापलिंग गडावरील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. आता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भागविकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी देणार आहे. ज्या वेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी आली त्या वेळी आपण शासनाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करून शर्यतीवरील बंदी उठवली. त्यामुळे आज बैलगाड्यांचा आनंद घेता येत आहे. थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने यात्रेचे चांगले नियोजन केले जात आहे. त्या सर्वांना वळसे पाटील यांनी धन्यवाद दिले. दरम्यान, थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष निकम व सचिव डी. एन. पवार यांच्या हस्ते वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे यांनी केले.