राहुरी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मात्र ग्रामसभेला अनुपस्थित असणाऱ्या पदाधिकारी व अधिकाऱ्यां बद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सरपंच सौ. मालतीताई साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला युवा तसेच ज्येष्ठ वर्गाने उपस्थिती दाखवली. सभेमध्ये गावातील आवश्यक कामांसह रस्त्याच्या व इतर शासकीय योजनां बाबत माहिती, मागील ग्रामसभेचा इतिवृत्ताचे वाचन ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी केले.
ग्रामसभेमध्ये सबकी योजना सबका विकास जन मोहिमे अंतर्गत आर्थिक वर्षाचा विकास आराखडा तयार करणे, घरपट्टी व पाणीपट्टी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नागरी सुविधा, ग्रामपंचायत निधी, जिल्हा परिषद उपकर, मनरेगा अंतर्गत अपूर्ण विकास कामे, १४ व १५ वा वित्त आयोग, लसीकरण आदि विषयांवर चर्चा झाली. त्याचबरोबर सन २०२२-२३ च्या अंदाज पत्रकास मंजुरी घेणे आदि विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. तसेच मुस्लिम समाज विषयी अडचणी देखील लोकप्रतिनिधींना सांगून त्यांच्या कब्रस्थानचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी वर्ग व पत्रकार तसेच ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. यामध्ये राहुरी खुर्दचे पोलिस पाटील बबनराव अहिरे यांनी पदभार मुक्त करत असल्याने त्यांचाही सत्कार निसार शेख यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच १४ गावे पाणी योजनेचे सदस्य म्हणून शिवाजी शेंडे यांचाही सत्कार करण्यात आला.
