सोशल मिडीयावर पोस्ट टाकून मा. आ. तनपुरेंनी मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी विधानसभेतील पराभवा नंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत असून विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली. तसेच राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्या बाबत सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.
विधानसभा निवडणुकीत युती सरकारचे कल दिसत असल्याने राहुरी विधानसभा मतदार संघात विक्रमी काम करूनही व लोकप्रियता असूनही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागातील बांधकामांची थकित देणे आहेत, त्यावर माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
तनपुरे म्हणाले की, सरकारच्या विविध विभागांद्वारे सुरू असलेल्या बांधकाम कार्याचे सुमारे ८९ हजार कोटी रुपये शासनाने जुलै २०२४ पासून थकवले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सुरू असलेली कामे थांबवण्याचा थेट इशारा सरकारला दिला आहे. ५ फेब्रुवारी पासून विकास कामांना थांबा लागणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही. त्यात सुकाळ योजनांचा बोजा स्वार्थासाठी शासनाच्या तिजोरीवर ओढवून घेतला. आता विकास कामे बंद होण्याची नामुष्की सरकारवर येतेय, यातच यांचा फोलपणा लक्षात येतो, असा टोलाही माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.
