दहशतीची किड नष्ट केली…!
पारनेर / प्रतिनिधी
खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यात दहशतीची किड पसरली होती. ती थांबवण्याचे काम नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघांतील सुज्ञ मतदारांनी केल्याने जिल्हा शांत झाला आहे. जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे. त्याला तडा जाऊ न देता विकासकामे मोठ्या प्रमाणात करणार असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते यांनी दिली.
देवीभोयरे येथे ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भाऊसाहेब खिलारी होते. अंबिका देवीच्या मंदीरात गावचे माजी उपसरपंच विकास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नवसाची नवसपूर्ती गुळतुला करुण करण्यात आली.
यावेळी भाजप नेत विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रखमाजी कापसे, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, युवा तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, युवा नेते दिलीप दाते, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष दुधाडे, भाजपचे सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. दाते म्हणाले, गेली पाच वर्षे तालुका दहशतीखाली होता. मात्र गेली ४० वर्षात आपण जे सामाजिक काम केले त्यावर विश्वास ठेऊन जनतेने दहशत मोडून काढीत निवडून दिले. त्यामुळे तालुक्यातील पाट पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे. विधानसभेत लक्षवेधी मांडून विविध सुचना केल्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहेत. कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा कालवा हे अस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहाणी करीत मंजूर केला असून लवकरच हे कामे सुरू होणार आहेत.
माजी खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी गेली पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहे. ३८६ कोटी रुपयाच्या आळेफाटा-शिरुर रस्त्यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच शुभारंभ होणार आहे. माजी खा. विखे यांनी भरपूर विकासकामे केली मात्र विरोधकांनी अपप्रचार करुण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील विकासकामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करुण विकासकामे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच पिंपळगाव जोगा धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी रविवारी अळकुटी येथे बैठक घेणार असल्याची माहिती दाते यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनीही आमदार दाते यांचा गौरव करीत तालुका विकासाला गती येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच बाबुराव मुळे, विश्वनाथ गाजरे यांनी केले. विकासकामांची माहिती देत आमदार दाते हे विकासपुरुष असून देवीभोयरे परिसराच्या विकासासाठी आमदार दाते, विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील शिंदे हे त्रिमूर्ती विकासाचे शिल्पकार ठरतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षक सुभाष महाराज मगर यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
अमोल गजरे यांनी केले तर माजी उपसरपंच विकास सावंत यांनी आभार मानले.
चौकट
