Type Here to Get Search Results !

राहुरी - बचत गटातील २९ महिलांच्या बँक खात्यातून साडेसात लाखांचा अपहार.बँकेचा व ग्राहकांचा विश्वासघात करून त्यांचे सिबील खराब केल्याचा गुन्हा.


 

बचत गटातील २९ महिलांच्या बँक खात्यातून साडेसात लाखांचा अपहार.


बँकेचा व ग्राहकांचा विश्वासघात करून त्यांचे सिबील खराब केल्याचा गुन्हा.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेत क्वेस कॉर्प लिमिटेडतर्फे नियुक्त केलेल्या एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केला. बचत गटाच्या २९ महिला ग्राहकांच्या बँक खात्यातून एअरटेल पेमेंट बॅंकेच्या मदतीने ७ लाख ५३ हजार ७९२ रुपयांचा अपहार केला. 


किशोर संजय पोपळघट, वय ३१ वर्षे, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात क्वेस कॉर्प लिमिटेडचे जनरल मॅनेजर श्रीधर मधुकर भोर, वय ४४ वर्षे, रा. डोंबिवली, मुंबई यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीने हेतु पुरस्सर ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली. बँकेचा व ग्राहकांचा विश्वासघात करून त्यांचे सिबील खराब केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.


फिर्यादीत म्हटले की, क्वेस कॉर्प लिमिटेड तर्फे भारतातील विविध क्षेत्रातील आस्थापनांना तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवांचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ॲक्सिस बँक लिमिटेड आमचे ग्राहक आहे. राहुरी खुर्द येथील ॲक्सिस बँकेचे शाखाधिकारी कुंदन पाटील यांनी ई-मेलद्वारे कळविले की, क्वेस कॉर्प लिमिटेडचे किशोर संजय पोपळघट याची नोव्हेंबर २०२४ मध्ये बँकेच्या शिर्डी शाखेत बदली केली. तेव्हा राहुरी शाखेच्या कलेक्शन ऑडिट मध्ये त्याने बँकेच्या ग्राहकांच्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे.


जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान आरोपी पोपळघट याने एअरटेल पेमेंट बॅंकेमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर वापरून कर्जाचे अर्ज भरतो आहे, असे सांगून सर्वप्रथम बायोमॅट्रिक द्वारे ग्राहकांचे बचत खाते उघडले. खात्याचा नंबर आल्यावर ॲक्सिस बँकेच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली. ती कर्जाची रक्कम एअरटेल पेमेंट बँकेत वर्ग करून घेतली. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यातून रोख स्वरूपात त्याचे ओळखीचे इसमाकडून (एअरटेल बँकेचा एजंट) पैसे काढून घेतले. 


एकुण २९ ग्राहकांचे बचत गटाच्या माध्यमातून त्यांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून व स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून एअरटेल पेमेंट बँकेच्या मदतीने रुपये ७ लाख, ५३ हजार ७९२ रकमेचा अपहार केला आहे. त्यांची फसवणूक केली. त्यांचे सिबील खराब केले. त्यामुळे त्यांना इतर बँकेत कर्ज भेटत नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेत शोभा चांगदेव बार्डे यांची ३२ हजार ९३५ रु, अनिता संभाजी वायदांडे यांची १३ हजार ३८४, सविता माणिक पवार यांची १३ हजार ३८४, सिंधूबाई अंबादास केंदळे यांची १३ हजार ३८४, पमा संजय पगारे यांची २१ हजार ८०३, अंजली रवींद्र बार्डे यांची १६ हजार ७४६, अश्विनी तेजस कांगले यांची २८ हजार, ३६३, बालूबाई कैलास जाधव यांची २७ हजार ९८६, भागिरथीबाई बाळासाहेब मोरे यांची ३४ हजार ९६५, सुलोचना रामदास बार्डे यांची २७ हजार ९८६, सुनिता बदाम माळी यांची ३५ हजार ९६५, अलका भीमराज मोरे यांची १८ हजार २३५, राधा रोहिदास बार्डे यांची २३ हजार ४०७, रुपाली सुनील पवार यांची १८ हजार २३५, शोभा सुखदेव बर्डे यांची १८ हजार २३५, सुरेखा रवींद्र गवळी यांची १८ हजार २३५, संगीता जालिंदर गाडेकर यांची ३६ हजार ७८०, मंदा भीमा पिंपळे २८ हजार ९४९, पुष्पा ज्ञानदेव पवार यांची २८ हजार ९४९, सविता ज्ञानदेव पवार यांची ३७ हजार २०६, सुरेखा आजीनाथ वाघ यांची ३७ हजार २०६, बिजियाला छाबू बार्डे यांची ३६ हजार ७४६, येणूबाई अरुण गांगुर्डे यांची ३६ हजार ७४६, बेबिता सुनील मुळेकर यांची १९ हजार ४०७, जयश्री अनिल गवळी यांची १९ हजार ४०७, मंगळा सुभाष माळी यांची २७ हजार ३१६, रुपाली मारुती बार्डे यांची २० हजार ७४७, सपना शरद गवळी यांची १९ हजार ४०७, अनिता रंजीत बार्डे यांची ४० हजार ६७८ रुपए असे एकूण ७ लाख ५३ हजार ७९२ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले.