Type Here to Get Search Results !

आंबेगाव - निरगुडसर येथे बिबट्याने केली कालवडीची शिकार

 



निरगुडसर येथे बिबट्याने केली कालवडीची शिकार 


प्रतिनिधी - आंबेगाव


निरगुडसर ता. आंबेगाव येथील विकासनगर (डफळी) येथे बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कालवडीची शिकार केल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी पहाटे दोन अडीच वाजताचे सुमारास घडली आहे. 


निरगुडसर ता. आंबेगाव येथील निरगुडसर - मेंगडेवाडी रस्त्यावर असलेल्या विकासनगर (डफळी) येथील शेतकरी विकास मारुती मेंगडे यांच्या ओपन गोठ्यात सहा गाई, दोन शेळ्या, एक बैल व अडीच महिन्याची कालवड असून. बिबट्याने बुधवारी पहाटे अंदाजे दोन, अडीच वाजता गोठ्यात प्रवेश करत दोरीने बांधलेल्या कालवडीला ठार केले तिला ओढून लांब नेण्याचा प्रयत्न केला मात्र कालवड दोरीने बांधलेली असल्याने ती बाहेर नेता न आल्याने बिबट्याने जागेवर तिचा फडशा पाडला. सकाळी शेतकरी विकास मेंगडे हे उठले असता त्यांना गोठ्यात कालवड मृत अवस्थेत दिसली याबाबत त्यांनी वनविभागाचे अधिकारी यांना कळविले असता वनरक्षक अश्विनी डफळ, वनमजूर दशरथ मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.


या परिसरात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असून विकास मेंगडे यांच्या गोठ्यातील बारा कोंबड्या बिबट्याने सहा महिन्यापूर्वी फस्त केल्या आहेत. तसेच सहा महिन्यापूर्वी एक पाळीव कुत्रा व दोन महिन्यापूर्वी एक पाळीव कुत्रा अशी दोन कुत्रे देखील ठार केले आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा बिबट्या त्यांनी घराच्या समोर पाहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी विकास मेंगडे, कैलास सुडके, डॉ. विलास मेंगडे, मंगेश सुडके, हरीश सुडके, विशाल मेंगडे, राजू वळसे, शाहरुख इनामदार, प्रसाद मेंगडे यांनी केली आहे.


फोटो ओळ - निरगुडसर येथील विकासनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी वनरक्षक अश्विनी डफळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.