Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा - शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे नुकसान





 

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा 

शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे नुकसान 

पारनेर : ता. प्रतिनिधी 


सोमवार दि. ५ मे  रोजी वादळी वाऱ्यासह अर्धा ते पाऊण तास गारपीटसह पाऊस झाला. यामुळे टोमॅटो, वाटाणा, कोबी, कलिंगड, चारापीक, फळभाज्या, फळबागा या पिकांसह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला अथवा चाळीमधील कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. टाकळी ढोकेश्वर, सुपा परिसरातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पंधरा ते वीस मिनिटे हजेरी लावली. पावसामुळे मात्र ऐन उन्हाळ्यामध्येही थोड्याफार कालावधीसाठी गारवा निर्माण झाला होता‌. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश आ. काशिनाथ दाते सर यांनी तहसिलदार पारनेर गायत्री सौंदाणे यांना दिले आहे. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तिखोल, वनकुटे, खडकवाडी, कामठवाडी, पळशी आदि गावांमध्ये  मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने वटाणा, कोबी, कलिंगड,टोमॅटो, भाजीपाला, फळबागा आदी पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त भागावर मोठे अस्मानी संकट ओढावले असल्याने नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश आमदार महोदयांनी तहसिलदार यांना दिले.


🔸 चौकट :  यंदा उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली पिके जोपासली होती. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तहसीलदार व कृषी अधिकारी यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे साठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे : 


आ. काशिनाथ दाते,( विधानसभा सदस्य )