Type Here to Get Search Results !

राहुरी - महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका बैलाचा बळी गेला

 महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका बैलाचा बळी गेला.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ऊसाच्या शेतात मशागत करीत असताना वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे राहुरीतील सुनील पंढरीनाथ गुलदगड या शेतकर्‍याचा जवळपास ५० हजार रुपयांचा पंढरपुरी खिलार जातीच्या बैलाचा बळी गेल्याची घटना घडली आहे.


सुनील पंढरीनाथ गुलदगड हे शेतकरी आपल्या बैलजोडीने स्वतःच्या शेती बरोबरच इतरांच्या शेतीतील ऊसाची अंतर मशागत करून देण्याचा व्यवसाय करतात. गुरुवार ५ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुनील गुलदगड हे राहुरीतील अमोल उर्फ अण्णासाहेब अशोक तनपुरे यांच्या शेतातील उसाची अंतर मशागत करण्यासाठी गेले असताना, उसाच्या शेतातील चालू विज असताना वीज वाहिनीची तार तुटून खाली पडली होती. त्या तारेवर मशागत सुरू असताना बैलाचा पाय पडला आणि बैल जागेवर गतप्राण झाला. 


याच वेळी दुसर्‍या बैलाला वाचवण्यात गुलदगड यांना यश आले, परंतू त्यांच्याही हाताला दुसरा बैल वाचवताना विजेचा धक्का बसून मोठी इजा झाली. या घटनेत गुलदगड बचावले, मात्र एक बैल गेला. गेल्या अनेक दिवसांपासून या तारा खाली लोंबकळत असताना, शेतकर्‍यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, परंतू महावितरण कार्यालयाने कोणतीही दखल न घेतल्याने सदर दुर्घटना घडल्याचा आरोप परिसरातील शेतकर्‍यांनी केला आहे. 


या बैलाच्या जीवाची भरपाई महावितरणने करून द्यावी, त्याचबरोबर तालुक्यात व शहरातील व परिसरातील शेतातील खाली लोंबत असलेल्या विजेच्या तारांना त्वरित ताण देऊन व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी राहुरीतील शेतकरी करीत आहेत. वीज मंडळ शेतकर्‍यांना कोणत्याही सुविधा न देताना या जीवघेण्या अक्षम्य गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


दरम्यान, या घटनेनंतर राहुरीचे कामगार तलाठी बाचकर यांनी मृत झालेल्या बैलाचा पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी श्री. वाबळे यांनी या बैलाची उत्तरीय तपासणी करून अहवाल सादर केला आहे.